A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बियावाचुनि झाड वाढते

एक फेकते सवाल पहिला उत्तर याचे देई ग
बियावाचुनि झाड कोणते आभाळावर जाई ग?

बियावाचुनि झाड वाढते, ही तर हरीची माया ग
निळ्या ढगांचे झाड देतसे उभ्या जगाला छाया ग !

चंद्रावरती डाग कशाचा काळा काळा राही ग?
छाप सशाचा की हरिणीचा सांग शोधुनी बाई ग

दिवसभराच्या रंगबाजीला अशी थकावट येते ग
चंद्रसख्याच्या छातीवरती रात विसावा घेते ग !

पानविड्याचा पिंक लोचनी, काजळ लागे ओठी ग
अन्‌ भाळावरती मेंदी ल्याला कसा सांग जगजेठी ग

श्रीकृष्णाचे नयन मनोहर राधा चुंबी रात्री ग
तिच्या मुखीचा पिंक राहिला श्रीकृष्णाच्या नेत्री ग
राधेचेही चुंबी डोळे परतफेडीने जगजेठी
तिच्या नेत्रीचे काजळ उरले श्रीकृष्णाच्या ओठी
आली होती मेंदी लावून राधा पाया-नखा
आर्जविता तिज पाया पडला नटवर कृष्णसखा
त्या मेंदीची टिकली राही तशीच त्याच्या भाळी ग
तीच भूषणे लेवून परते श्याम उजळत्या वेळी ग

तीरकमठ्यासह दोन पारधी गोरा पर्वत चढले ग
तीळास थटुनी नखाएवढ्या तळ्यात दोघे बुडले ग
बुडले ते ना वरी निघाले रमले त्या ठायी
अशी कशी ही सांग बाई ग झाली नवलाई

दोन चोरटे पुरुषी डोळे न्याहाळती नवनार
पायापासून तिला न्याहाळीत वरी पोचले पार

हनुवटीवरती तीळ तियेच्या गालावरती खळी
तिथेच खिळुनी बसले वेडे भान न त्यांना मुळी
जगजेठी - जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर.
ठाय - स्थान, ठिकाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  आशा भोसले, पुष्पा पागधरे