A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारी घेत नाहीं ॥२॥

बंधनापासूनि उकलली गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥

तुका ह्मणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
गीत - संत तुकाराम
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
किशोरी आमोणकर
प्रभाकर कारेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी, विठ्ठल विठ्ठल
  
टीप -
• स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- पं. जितेंद्र अभिषेकी.
• स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर, राग- विभास व तोडी संमिश्र.
• स्वर- पं. प्रभाकर कारेकर, संगीत- ???.
सोसे - आग्रहाने.
हावभरी - आशायुक्त, हावरा.
भावार्थ-

  • विठ्ठल बोलावे व विठ्ठलाला पहावे. जिवाचा जिवलग विठ्ठलालाच करावे.
  • मन विठ्ठलाकरिता हांवरे झाले असून आग्रह धरते. तेथून ते परत मागे येत नाही.
  • संसाराचे बंधन मी सोडून टाकले आहे. त्यामुळे मला सावकाश विठ्ठलाला मिठी मारायला मिळाली.
  • काम क्रोध निघून गेल्यामुळे देहरूपी घर रिकामे होऊन तेथे आता सगळा विठुराया भरून राहिला आहे.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

 

  पं. जितेंद्र अभिषेकी
  किशोरी आमोणकर
  प्रभाकर कारेकर