A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छबीदार छबी मी तोर्‍यात

अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना
ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा, हितं शाहिरी लेखणी पोचंना
हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगाढोंगाचा बाजार इथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी
अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ भायेर नळी रं रं रं

अगं चटकचांदणी, चतूर कामिनी
काय म्हणूं तुला, तू हायेस तरी कोन

छबीदार छबी मी तोर्‍यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं

नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं

डौल दावते मोराचा, तिरपा डोळा चोराचा
ओढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं

मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
अरं बत्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- उषा मंगेशकर
चित्रपट - पिंजरा
गीत प्रकार - चित्रगीत, लावणी
ओटी - ओसरी, घराचा ओटा / पदर.
नवती - तरुणी / तारुण्य / नवी पालवी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.