A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चल्‌ झेलूया गाणे

चल्‌ झेलूया गाणे, वासंतीक उखाणे
कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने!

गर्भरेशमी पाऊलवाटा कशा सुगंधी झाल्या?
जळथेंबाचा पाऊस नसुनी दिठीदिठीतुन न्हाल्या
हे कुठले अमृतदेणे? हे वासंतीक उखाणे
कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने!

पदराचा कापूर जाहला, हवेत उडतो बाई
डोळ्यांमधल्या स्वप्‍नांवरती रंग शिंपुनी जाई
हे पंख नसुनी उडणे, हे वासंतीक उखणे
कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने!

मंदिर झाले या हृदयाचे, दिशाच झाल्या बाहू
ओंजळीतला ऋतू फुलांचा कुठल्या चरणी वाहू?
हे तुझेच अक्षय लेणे, हे वासंतीक उखाणे
कांचनआशा बहरुन आल्या वयात आली राने!
गीत- प्रवीण दवणे
संगीत - शांक-नील
स्वर - सुमन कल्याणपूर
गीत प्रकार - भावगीत
कांचन - सोने.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.