A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चले जाव चले जाव

चले जाव, चले जाव, चले जाव !

हिंदुस्थान माझा देश
माझा प्यारा भारत देश
मालक मी या भूमीचा
माझी शेते, माझे डोंगर
माझी गंगा, माझा सागर
हिमालयाच्या शिखरावरुनी
सांगुं जगाला सार्‍या गर्जुनि
खबरदार जर इथे याल तर
सांडतील रक्ताचे सागर

तुम्ही-आम्ही भाई-भाई
भारतमाता आमुची आई
बच्चे आम्ही शूरांचे
वारस आम्ही वीरांचे
फौज आमुची चाळिस कोट
फोडूं साम्राज्याचे कोट
शेतकर्‍यांचे कामकर्‍यांचे
निशाण धरुनी उंच क्रांतिचें
फोडूं नरडें जुलुमशाहिचें
मंत्र गर्जुनी स्वातंत्र्याचे

देशासाठी आम्ही मरूं
प्राणांचे बलिदान करूं
मोडुनि टाकूं हे शतखंड
गुलामगिरिचे साखळदंड
चला तिरंगी धरुनि निशाण
स्वतंत्र करूं या हिंदुस्थान
नव्या युगाचा वाजे डंका
मानवतेच्या ऐका हाका
अडवे येतिल त्यांना ठोका
एकमुखाने करा गर्जना

चले जाव, चले जाव, चले जाव !