A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चमके शिवबाची तलवार

पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी

चमके शिवबाची तलवार !
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार

पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
तख्त-दौलतीसमोर केली ना लाचारी
कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी
तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला
मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली
जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली
महाराष्ट्रावर प्रेम अपार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
चमके शिवबाची तलवार !

शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी
"हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी"
पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला
शिवाजी लागे अजमावयास शत्रूला
शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले
बघुन मर्द शिवा, खान मनी घाबरले
केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
शाहिस्ता बोलतसे, "या तौबा, या अल्ला !"
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
चमके शिवबाची तलवार !

तेव्हा अफझुलखाना क्रोध भारी मग चढला
कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
"पहाड का चुहा है शिवाजी फिर भी बच्चा
मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा"
बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले
प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले
"आओ मिलो हम से ।" म्हणुनी,
खान भिडे शिवबाला
करून धोका अफझुल करी वाराला
झाला शिवराया हुश्शार
केला क्षणांत अफझुल ठार
चमके शिवबाची तलवार !
म्यान - तलवारीचे घर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.