टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा
त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा !
डावी पापणी फुरफुर करी
नवसाला अंबाबाई पावली खरी
अवचित सजणा आला घरी
मनच्या खुशीत की मजला कुशीत घ्या दिलदारा !
पंचकल्याणी घोड्यावरून
दौडत आलो सये दुरुन
रूप घेऊ दे डोळा भरून
तुजला बघून ग जाईल निघून हा थकवा सारा !
शालूच्या पदरानं पुसते हो पाय
खायाला देते मी साखरसाय
आणखीन सेवा करू मी काय?
पडते गळा की लावते लळा की द्या आधारा !
नेसुन चांदणं आलीस अशी
पुनव चांदणी झुकली जशी
डाव्या हाताची घे ग उशी
चांदणं मिठीत की चांदणं दिठीत झिमझिम धारा !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | गारंबीचा बापू |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत, शब्दशारदेचे चांदणे |
पंचकल्याणी | - | ज्याच्या अंगावर पाच शुभ चिन्हे आहेत असा. |
शेवटी त्यांनी मला विचारले, "तुम्ही लहानपणापासून खेड्यापाड्यांतली गाणी सतत ऐकत आला आहात. त्यांतले एखादे लोकगीत, निदान त्याचे तोंड तुम्हाला आठवते का?"
मी जरासा विचार करून म्हटले, "एका जुन्या लोकगीताच्या प्रारंभीच्या दोन-तीन ओळी जेमतेम स्मरणात आहेत. सांगू का?"
चंदावरकर म्हणाले, "सांगा ना. त्यांचा उपयोग करता आल्यास बघू."
मी ओळी सांगितल्या, "चांदणं टिपूर, हलतो वारा की डुलतो वारा । टाकते पलंग पुढल्या दारा की मागल्या दारा । त्यावर बसा की हवालदारा की शिलेदारा !"
चंदावरकरांना त्या ओळी आवडल्या. ते म्हणाले, "गाण्याचा हाच मुखडा आपण कायम करू. तुम्ही पुढची कडवी त्याला जोडायची."
ते काम सोपे वाटले. मी दोन स्त्रीची व दोन पुरुषाची अशी कडवी लिहिली. गाणे तयार झाले व नंतर उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी ते सुरेख गायिले.
मला माझी जी गाणी फार आवडतात, त्यांपैकी ते एक आहे.
(संपादित)
शान्ता शेळके
'चित्रगीते' या शान्ता शेळके यांच्या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- उत्कर्ष प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.