A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चंद्रावरती दोन गुलाब

चंद्रावरती दोन गुलाब
सहज दृष्टिला घडला लाभ

उंच इमारत संगमरवरी
उभी गवाक्षी यवनसुंदरी
पडदा सारून बघे बावरी
गोल चेहरा नयनी शराब

पथक सोडुनी वळे वाकडा
थयथय नाचत अबलख घोडा
वरिल मराठा गडी फाकडा
दुरुन न्याहळी तिचा रुबाब

किंचित ढळती निळी ओढणी
भाळावरती हळूच ओढुनी
तीही न्याहाळी त्यास मोहुनी
नयनांचे मग मुके जबाब

तोच येउनी भिडली काना
राघोबाची मेघगर्जना
नगरपार ही चलू द्या सेना
वळला घोडा सरला लाभ

अटकेवरती झेंडा रोवुनी
पुण्यास आल्या परत फलटणी
तरीही त्याच्या मनी लोचनी
तरळत होते एकच ख्वाब
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
अटक - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सिंधू नदीकाठचे शहर (Attock). राघोबादादा पेशव्यांनी येथपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला होता.
अबलख - पांढर्‍या व काळ्या दोन रंगांचा.
गवाक्ष - जाळी / खिडकी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.