A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
छुन्‍नुक छुन्‍नुक टाळ वाजवी

छुन्‍नुक छुन्‍नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरांसंगं गातो तुझी विठ्ठला गाणी

मोत्यांच्या कणसात डोलते तुझे देखणे रूप
निळंसावळं धुकं भोवती, कुणी फिरविला धूप
ही भक्तीची फुलं उमलली विठू तुझ्या चरणी

पंख उभारून ऊस उभा हा मोर जसा डोलतो
मुळा नि कांदा कोथिंबिरीतून विठू बघा नाचतो
घाम गाळिता रोप सुखावे विठू तुझी करणी

मातीमधला अबीरबुक्का रोज लावितो भाळी
तुझं नाव मी घेता देवा, पान वाजवी टाळी
विठ्ठल अवघा झाला मळा, ओठी अभंगवाणी
अबीर - एक सुगंधी पूड.
बुक्का - एक सुगंधी पूड.