A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दारा बांधतां तोरण

दारा बांधतां तोरण
घर नाचलें नाचलें;
आज येणार अंगणीं
सोनचाफ्याचीं पाउलें?

भिंती रंगल्या स्वप्‍नांनीं
झाल्या गजांच्या कर्दळी;
दार नटून उभेंच
नाही मिटायाची बोली !

सूर्यकिरण म्हणाले,
घालूं दारांत रांगोळी;
शिंपूं पायांवरी दंव
म्हणे वरून पागोळी !

भरूं ओंजळ फुलांनी
बाग म्हणे लहरून;
देईन मी आशीर्वाद
केळ म्हणाली हासून

येरझारा घाली वारा
गंध मोतिया घेउनी;
सोनचाफ्याचीं पाउलें
आज येतील अंगणीं !

सोनचाफ्याचीं पाउलें
आज आलीत अंगणीं !