A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इथेच टाका तंबू

चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू !

जाता जाता जरा विसावा
एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू !

थोडी हिरवळ, थोडे पाणी
मस्त त्यात ही रात चांदणी
उतरा ओझी, विसरा थकवा
सुखास पळभर चुंबू
इथेच टाका तंबू !

अंग शहारे जशी खंजिरी
चांदही हलला, हलल्या खजुरी
हलल्या तारा हलला वारा
नृत्य लागले रंगू
इथेच टाका तंबू !

निवल्या वाळूवरी सावली
मदमस्तानी नाचु लागली
लयीत डुलती थकली शरिरे
नयन लागले झिंगू
इथेच टाका तंबू !
खंजिरी - घुंगरू लावलेला डफ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे