सासरा माझा गांवी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करिते । लवकर नेई ग [१] तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचें कारटं [२] किरकिर करितें । खरूज होऊं दे त्याला ॥५॥
दादला मारून आहुती देईन । मोकळी कर ग मला ॥६॥
एका जनार्दनीं सगळेंच जाऊं दे । एकटीच राहूं दे मला ॥७॥
गीत | - | संत एकनाथ |
संगीत | - | शाहीर मनोहर जोशी |
स्वर | - | शाहीर मनोहर जोशी |
गीत प्रकार | - | लोकगीत, संतवाणी, या देवी सर्वभूतेषु |
टीप - • [१] - मूळ भारुडात 'निर्दाळी' (निर्दालन - नायनाट, संपूर्ण नाश.) • [२] - मूळ भारुडात 'पोर' |
खरूज | - | त्वचेचा एक रोग. |
दादला | - | नवरा. |
बोडकी | - | केशवपन केलेली विधवा. |
रोडगा | - | कणकेचा वरवंट्यासारखा जाड भाजलेला गोळा. |
सत्वर - लवकर
आहुती - बळी
सासरा - अहंकार
सासू - कल्पना
जाऊ - इच्छा (कामाजीची बायको)
नणंदेचे पोर - द्वेष
दादला - अविवेक
भावार्थ-
माणसातील चित् शक्ती प्रज्ञा, प्रतिभा आणि सुबुद्धी या मार्गाने प्रगट होते. ही बुद्धी अनादि निर्गुण अशा मायेला नवस बोलत आहे कारण जिवाला उद्धाराची तळमळ लागली आहे म्हणून ती त्वरेने पाव असे म्हणते. तशी पावशील तर आत्मनिवेदन हाच जणू रोडगा, तो अर्पण करते असेही म्हणते. म्हणजे संपूर्ण शरणागती. हेच सत् शिष्याचे ध्येय असते.
सासरा म्हणजे अहंकार. तो काळ देहबुद्धीपासून दूर गेला म्हणजे गावी गेला. त्याला तिकडेच नष्ट होऊन जाऊ दे.
देहबुद्धी ही सासू. ती फार जाच करते म्हणजे एका तिच्या खुशीसाठी पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, तीन गूण सर्वांना कामाला लावते. सुबुद्धीचा कोंडमारा करते. लोकेषणा, पुत्रेषणा, वित्तेषणा, दारेषणा यासाठी बुद्धीला झिजवते. त्यामुळे जाच होतो. म्हणून तिला लौकर निर्दाळून टाक. देहबुद्धी गेली की आत्मनिवेदन सोपे असते. सासू मेली की रोडगा वाहता येतो.
वासना ही जाऊ. ती फटकळपणे बोलते. तिच्याबद्दलचे मागणे अगदी फटकळपणेच मांडले आहे. तिला बोडकी कर. म्हणजे तिचा नवरा जो काम त्याला मरण येऊ दे, असे म्हटले आहे.
आशा, मनीषा ही नणंद. मोह हे नणंदेचे पोर. ते किरकिर करते म्हणजे सारखे आपण मोहात पडतो. तर मोहच खरजेसारख्या रोगाने ग्रासला तर बरे होईल म्हणजे तो पाहिजे पाहिजे करीत सतावणार नाही.
संकल्पाचा भाऊ विकल्प हा नवरा. त्याला मारून त्याची आहुती द्यायची. वैराग्याच्या होमात संकल्प, विकल्प नष्ट करायचे म्हणजेच मनाचे अमनीकरण करावयाचे.
ज्ञानेश्वरीतील भगवंतांच्या भाषेत सांगायचे तर "तू मन हे मीच करी ।" असे व्हावयाचे. एकलीच राहाण्याचा अर्थ असा की द्वैत आणि अद्वैताच्याही पलीकडे जे आहे त्याच्याशी एकरूप व्हावयाचे. म्हणून सगळेजणच गेले पाहिजेत. जनार्दनांच्या एकनाथ महाराजांचे सद्गुरू शरण्य सिद्ध झाले आहे.
(संपादित)
व्यंकटेश कामतकर
सार्थ भारूडे
सौजन्य- धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.