A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दशरथा घे हें पायसदान

दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलों हा माझा सन्मान

तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्‍न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान्‌

श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान

राण्या करतिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान

प्रसवतील त्या तीन्ही देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान

कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भीमपलास
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २९/४/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
उपमान - तुलना.
ओज - धमक / तेज.
क्षीर - दूध.
कामधेनु - इच्छित वस्तू देणारी गाय.
नृप - राजा.
पायस - दूध, तांदूळ व साखर यांपासून केलेली खीर, प्रसाद.
स्थाली - थाळी.
सांगता - पूर्णता.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण