A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दाटला चोहिकडे अंधार

दाटला चोहिकडे अंधार
देउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार

आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध, ती मृगया भीषण
पारधींत मी वधिला ब्राह्मण
त्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार

त्या अंधाची कंपित वाणी
आज गर्जते माझ्या कानीं
यमदूतांचे शंख हो‍उनी
त्याच्यासम मी पुत्रवियोगें तृषार्तसा मरणार

श्रीरामाच्या स्पर्शावाचुंन
अतृप्तच हें जळकें जीवन
नाहीं दर्शन, नच संभाषण
मीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार

मरणसमयिं मज राम दिसेना
जन्म कशाचा? आत्मवंचना
अजून न तोडी जीव बंधनां
धजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार?

कुंडलमंडित नयनमनोहर
श्रीरामाचा वदनसुधाकर
फुलेल का या गाढ तमावर?
जातां जातां या पाप्यावर फेकित रश्मीतुषार

अघटित आतां घडेल कुठलें?
स्वर्गसौख्य मी दूर लोटले
ऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,
भाग्यासम तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार

पाहतील जे राम जानकी
देवच होतिल मानवलोकीं
स्वर्गसौख्य तें काय आणखी?
अदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार?

क्षमा करी तूं मज कौसल्ये
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले
क्षमा देवते सती ऊर्मिले
क्षमा प्रजाजन करा, चाललों सुखदु:खांच्या पार

क्षमा पित्याला करि श्रीरामा
पतितपावना मेघश्यामा
राम लक्ष्मणा सीतारामा
गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार
श्री राम-श्री-राम-रा-म
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र जोगिया
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २६/८/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
अदृष्ट(ष्य) - न पाहिलेले / दैव, प्रारब्ध.
कुंडल - कानात घालायचे आभूषण.
केविं - कशा प्रकारे.
गंगोदक - गंगेचे पाणी (गंगा + उदक).
तम - अंधकार.
तृषा - तहान.
रश्मी - प्रकाश किरण.
रामागम - रामाचे आगमन (राम + आगम), रामाची भेट.
वंचना - फसवणूक.
वत्सल - प्रेमळ.
विप्र - ब्राह्मण.
श्रावण - एक वैश्य. यांस दशरथाकडून अनवधानाने मृत्यू आला असता त्याच्या मातापित्यांनी दशरथास "तू पुत्रशोक करत मरशील." असा शाप दिला.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
सुधाकर - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण