A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दाटून कंठ येतो

दाटून कंठ येतो ओठांत येइ गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने!

हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने!

बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयताल सूर लेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे!

घेऊ कसा निरोप? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे!
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे
आत्मजा - कन्या.
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.

 

  पं. वसंतराव देशपांडे