भासें जरी मी पतिता कुणा ॥
असुनि कलंकित अंतरीं अपुल्या ।
मिरविती कां हे व्यर्थचि कुलशीला ॥
| गीत | - | मो. ग. रांगणेकर |
| संगीत | - | मास्टर कृष्णराव |
| स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
| नाटक | - | कोणे एके काळी |
| राग / आधार राग | - | यमन |
| चाल | - | प्रीतम सैय्या लागी रे |
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
रंगदेवता प्रसन्न असलेल्या मास्तर कृष्णरावांना नाट्यकर्मी व रसिक 'रंगमूर्ती' म्हणत असत. तसेच मिश्किल व विनोदी स्वभावाचे मास्तर त्यांच्या बोलण्या व गाण्यातून आनंदाची मुक्त उधळण करत असल्यामुळे ते जिथे जातील तिथे निर्व्याज हास्याचा खळखळाट आणि आनंदाचे साम्राज्य पसरलेले असे, म्हणून बालगंधर्व त्यांना प्रेमादराने 'आनंदमूर्ती' असे संबोधत.
गुरुवर्य बखलेबुवांनी मास्तरांना लहानपणापासून ख्यालिये गवई म्हणून बैठकीतील शास्त्रीय गायनाची तालीम दिली होती. त्यामुळे मास्तरांनी कायम शास्त्रीय गायन सादरीकरणास प्राधान्य दिले. यास अजून एक महत्त्वपूर्ण घटना कारणीभूत होती. ८ एप्रिल १९२२ रोजी गुरुवर्य बखलेबुवांचे अकाली दुःखद निर्वाण झाले तेव्हा काही केल्या पिंडास कावळा शिवत नव्हता. त्यावेळी सर्वांनी "कृष्णा, आता तूच काहीतरी बोल," म्हणून मास्तरांना आग्रह केला. तेव्हा बुवांचे अत्यंत लाडके पुत्रवत पट्टशिष्य असलेल्या मास्तरांनी जड अंतःकरणाने आणि साश्रू नयनांनी चितेची राख भाळी लावून "तुमचे गाणे मी अखेरपर्यंत गात राहीन," असे गुरुवर्य बुवांच्या आत्म्यास वचन दिले तेव्हा कुठे पिंडास कावळा शिवला ! मास्तर दिल्या वचनास अखेरपर्यंत जागले. बखलेबुवा जिथेजिथे शास्त्रीय गायन सादर करत असत तिथून मास्तरांना गाण्याची निमंत्रणे येऊ लागली. तिथे ठिकठिकाणी जाऊन मास्तरांनी शास्त्रीय गायन सादर केले. तसेच अखिल भारतातील इतर अनेक ठिकाणांहून नव्याने त्यांना शास्त्रीय गायनाची निमंत्रणे येऊ लागली तिथेदेखील जाऊन ते गायन सादर करू लागले.
अशाप्रकारे पं.बखलेबुवांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा भारतभर प्रचार व प्रसार करण्याचे कार्य मास्तरांनी समर्थपणे पुढे नेले. या त्यांच्या महत्त्वपूर्ण उपक्रमास "मास्तर माझ्या गुरुंचे गाणे गातात" या विचाराने गुरुबंधू असलेल्या बालगंधर्वांनी देखील सदैव साथ देऊन मनापासून सहकार्य केले व गंधर्व नाटक मंडळीच्या नाट्यप्रयोगाच्या दिवशी जरी मास्तरांच्या शास्त्रीय बैठकीचे आयोजन असले तरी त्यांनी दरवेळी मास्तरांची त्या नाट्यप्रयोगातून बिनशर्त रजा मंजूर केली आणि त्यांना ठरल्या ठिकाणी जाऊन मनसोक्त गाऊ दिले. मास्तर गंधर्व नाटक मंडळीत गायक नट व संगीतकार म्हणून अखेरपर्यंत म्हणजे १९३३ साली ती कंपनी बंद पडेपर्यंत कार्यरत होते.
गंधर्व नाटक मंडळीतील नंदकुमार, मेनका, विधीलिखित, कान्होपात्रा, सावित्री, आशा-निराशा, अमृतसिद्धी (यावरील चित्रपट साध्वी मीराबाई) या पूर्ण नाटकांना व स्वयंवर, विद्याहरण, संशयकल्लोळ, द्रौपदी, एकच प्याला, सौभद्र यांसारख्या इतर अनेक नाटकांतील काही नाट्यपदांना तसेच राजाराम संगीत मंडळीच्या प्रेमसंन्यास नाटकाला, नाट्यनिकेतनच्या कुलवधू, एक होता म्हातारा, कोणे एके काळी आणि भाग्योदय या नाटकांना तसेच सुमतीबाई धनवटे यांनी लिहिलेल्या धुळीचे कण या नाटकाला मास्तरांनी स्वतंत्र स्वररचनेतील अवीट गोडीच्या चाली देऊन नाट्यसंगीत क्षेत्रात स्वतःचा वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. तशीच अतुल्य कामगिरी त्यांनी देश संगीत, चित्रपट संगीत आणि इतर संगीत क्षेत्रांत केलेली दिसून येते.
(संपादित)
प्रिया फुलंब्रीकर
सौजन्य- masterkrishnarao.com
(Referenced page was accessed on 19 June 2026)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख