A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दे रे कान्हा चोळी अन्‌ लुगडी

अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किस्‍नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी

ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी

गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्र सारी
बसला चढून कळंबावरी

नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन्‌ लुगडी

बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकान्‍ती
अजुनी का तुज त्या खेळाच्या छंदाची आवडी?

ऐन वयाची किमया सारी
लाजवंती मी भोळी बावरी
कशी येऊ मी काठावरती मदनाची लालडी?

तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी !

हात जोडिता बंधन तुटले
आता जिवाला मीपण कुठले?
आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी !
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - पिंजरा
राग / आधार राग - पिलू, खमाज
गीत प्रकार - चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
लालडी - रत्‍न.
वसन - वस्‍त्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.