A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देव जरी मज कधी भेटला

देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभु रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्‍नान घालु दे
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी
मुक्ताई निजवु दे तुजला

शिवरायाच्या मागिन शौर्या
कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा
लाभु दे चिमण्या राजाला
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत देसाई
स्वर- आशा भोसले
चित्रपट - मोलकरीण
गीत प्रकार - चित्रगीत
चिलया - श्रीयाळराजा व चांगुणाराणीचा पुत्र. यांची परिक्षा पाहण्यासाठी भगवान शंकराने चिलयाचे मांस मागितले. नंतर भगवान शंकराने यांस परत जिवंत केले.
ध्रुव - उत्तानपादराजाचा मुलगा. याचा लहानपणी अपमान व निर्भत्‍सना केला गेल्याने रागावून याने वनात मोठे तप केले व ध्रुव (अढळ)पद मिळविले.