देवा, तुला शोधू कुठं?
तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात
देवा, तुला शोधू कुठं?
कोठे असशी तू आकाशीं, कुठल्या गावी कोठे वसशी?
कुण्या देवळात?
देवा, तुला शोधू कुठं?
भलेबुरे जे दिसते भंवतीं, भलेबुरे जे घडते भंवतीं
तिथे तुझा हात
देवा, तुला शोधू कुठं?
स्वच्छंदी तू स्वत:चा सखा, येथे रमसी सांग उगा का?
या बाजारात
देवा, तुला शोधू कुठं?
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | मंगेश धाकडे |
स्वर | - | शाहीर देवानंद माळी |
चित्रपट | - | देऊळ |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
असे काही शब्द 'देऊळ' सिनेमासाठी मी लिहीन आणि ते आज पहातापहाता लहानथोरांच्या तोंडी खेळू लागतील, असं मी स्वप्नातही कधी आणलं नव्हतं. एका सुखद पण मजेदार योगायोगाची योजना ह्या पलीकडे त्यावर उत्तर नाही..
उमेश-गिरीश हे दोघेजण त्यांचा हा नवा सिनेमा, 'देउळ' काढत आहेत ही वार्ता कानावर होती. त्यांच्या ह्या नव्या चित्र-निर्मितीविषयी एक सहज-सुलभ उत्सुकता आत्मीयतेपोटी अर्थात मनांत होतीच. तसे सगळे छोटे-मोठे तपशीलही ओघाने कळत होते.. एक छोटासा तपशील मला अधिक वेधक वाटला होता.. स्वानंद किरकिरे हे चित्रपटाचे गीतकार आहेत. छान वाटत होतं. एका संध्याकाळी अचानक उमेश कुलकर्णीचा फोन आला. मी प्रकाश भोंडेकडे स्वरानंदच्या मिटिंगमध्ये होतो. एकदोन दिवसात कोल्हापूरला जायचा बेत होता. जरा भेटता येईल कां? असं फोनवर उमेश विचारत होता.. माझ्या आवडत्या अड्ड्यावर, लॉ कॉलेज रोडवरचं पद्मा फूड्स.. अर्ध्या तासात आम्ही भेटलोही. चित्रपट जवळजवळ पूर्ण होत आला आहे. पण एक आणखी गाणं, भजन स्वरूपाचं करावं कां? आणि तसं होणार असेल तर ते तुम्ही लिहाल कां? असं काहिसं तो विचारत होता. त्यानं येताना बरोबर संहिताही आणली होती.. ती पाहतोच.. पण त्यापेक्षा झालेलं काम पाहून घ्यावं, असं मी सुचवताच तोच म्हणाला, ते तर करायचं आहेच. नाहीतरी आमच्या प्रत्येक चित्रपटाचा पहिला रफ-कट तुम्हाला आम्ही दाखवतोच ना.. गोष्ट खरी होती.. 'वळू', 'विहीर' हे चित्रपटही सर्वात प्रथम मी असेच एडिटींग रूममध्ये पाहिले होते त्याविषयी साधकबाधक चर्चाही केली होती. तोच शिरस्ता आताही पाळायचा होता. दुसरेच दिवशी दुपारी मी उमेशच्या स्टुडियोत 'देऊळ'चा रफ-कट पाहिला. एकूण चित्रपटाचं गणित छान जमणार अशी चिन्हं स्पष्ट दिसत होती. वरकरणी 'वळू' आणि 'देऊळ' खूप समांतर वाटणारे विषय होते. कथा, वातावरण, व्यक्तिरेखां आणि एक दोन प्रमुख कलाकारही जवळजवळ त्याच रंगरूपांत होते.. दोन्हीची भूमी ग्रामीण जीवन हीच होती.. पण तरीही दोन्हीचे पोत वेगळे होते. मुख्य म्हणजे 'वळू'तील खेडं हे अमुक एका काळाशी निगडित नव्हतं. तर 'देऊळ'मधलं खेडं थेट आजचं एकविसाव्या शतकाचं खेडं होतं.. जणू 'वळू'मधील खेड्याचीच ही वर्तमान आणि भविष्यातील संभाव्य परिवर्तनाच्या भोवर्यात सापडलेली नवी दशा आणि दिशाही वाटत होती..
आपल्या धन्याच्या घरची गाय सांभाळणारा एक भाबडा तरुण.. एका दुपारी मोकळ्या माळावरच्या एका झाडापाशी त्याला आपल्याला दत्त-दर्शन झाल्याचा भास होतो. तो बेभान होऊन गांवभर, दत्त आले दत्त आले असं ओरडत फिरतो. पुरुष मंडळी त्याची टिंगल-टवाळी करून सोडून देतात.. पण गांवचा स्त्रीवर्ग हे प्रकरण खूपच मनावर घेतो. त्यामध्ये अग्रभागी चक्क त्याच्या मालकाची पत्नी असते.. परिणामी बघताबघता सगळ्या गांवाला दत्त-साक्षात्काराची लागण होते. गावठी राजकारण्याना ह्या मागच्या संभाव्य फायद्यांचा वास लागतो आणि पहातापहाता गांवाला श्रीदत्तक्षेत्राचं रूप येतं. विविध थरावरची गांवकरी मंडळी वाहत्या गंगेत हात धुवून घेउन घेउ लागतात.. काही प्रमाणात खुद्द तो वेडा-भाबडा तरुणही त्या लाटेत सांपडतो.. केव्हातरी भानावर येतो.. पण आता ती उठलेली लाट थोपवणे त्या भाबड्या भक्ताच्या तर नाहीच पण खुद्द देवाच्याही हाती उरलेलं नसतं. चांगलं कथासूत्र हाच यशस्वी चित्रपटाचा पाया असतो ही प्रचीती पुन्हा एकदा आली. 'वळू' आणि 'विहीर'च्या वेळी कमी-अधिक पडलेलं व्यावसायिक यशाचं माप ह्याखेपेला मागची भरपाई करणार ह्याच्या खुणाही स्पष्ट दिसत होत्या. उमेशचा मूळ प्रश्न होता.. भजन करावं की नको? मी गंमतीनं त्याला म्हणालो.. खरं म्हणजे एरवी सिनेमात गाणं नको असं म्हणायला मला अधिक उत्साह वाटतो.. पण इथं मात्र वाटतंय.. हे गाणं हवं.. नक्की हवं.. तशी घाई नव्हतीच. कोल्हापूरहून परत आल्यावरही चालेल असंच त्याला आणि मलाही वाटत होतं.. पण..
तो अजून अर्धाकच्चा असलेला रफ-कट पहातानाही मला एकूण अंदाज आला. चित्रपटाच्या रचनेबद्दल चर्चा करताकरता, नकळत एकीकडे, माझ्या मेंदूत हालचाल सुरू झाली.. गावरान बाजाचं भजन वाटेल अशी एक कविता मनात जुळत चालली. पुढच्या काही क्षणांत मी तिथलाच कागद मागून घेतला आणि ती अजून वाफा निघत असलेली ताजी कविता उमेशच्या हाती सोपवून तिथून बाहेरही पडलो.
चित्रपटाच्या पडद्यावर प्रसंगात विरघळून जाणारं आणि त्याचवेळी पडद्याबाहेरही जनमानसांत कायम मुक्काम करील असं आणखी एक गाणं माझ्या नांवावर ध्यानीमनी नसताना जमा झालं होतं. आत्मकौतुकाची अपूर्वाई आणि गरज आता फारशी नाही. पण तरीही मुकुंद फणसळकरची एक कॉमेंट मला खूप आवडते.. सुधीर मोघेंच्या गाण्यात कुठेतरी एका ठिकाणी त्यांची सही लपलेली असते.. साध्यासुध्या ग्रामीण बोलीतील ह्या आपादमस्तक खेडूत गाण्यातही, शेवटच्या अंतर्यात ती झोकदार स्वाक्षरी, माझी मलाही जाणवली आणि आतल्या कवीच्या जिवाला छान गारगार वाटलं.
(संपादित)
स्वगत संवाद - सुधीर मोघे ब्लॉग
सौजन्य- शुभदा मोघे
Print option will come back soon