A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धनगराची मेंढरं गा

धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं!
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं!

अवो साजिरी दिसत्यात
ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती!
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं!

आसं पुराणात लेकरु होतं
त्याचं सरावण बाळं
आंधळं आई-बाप बोललं
काशीला घेऊन चल
जलमदात्याची सेवा केली
दोघं दोन्हीकडं बसली
चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली, चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली!
आन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं!

ऊन सोसवंना उतरला
बघुन एक झाड
आई-बा म्हणालं
घशाला पडली कोरड
भांडं घेऊन गेला फुडं
आलं पान्यामंदी बुडबुडं
तिथं घडु नये ते इपरित घडलं, तिथं घडु नये ते इपरित सारं घडलं!
आन्‌ बाण आला, घुसला गा काळजाच्या पातुर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं!

मोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं
सांगणारा सांगून गेला
उरलं त्याचं नाव
आता कलियुग आलं
जग उफराटं झालं
अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं, अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं!
आन्‌ मायेचा गा झरा गेला, आटलाया पाझर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं!
गीत- जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - राम कदम
चित्रपट- मला तुमची म्हणा
गीत प्रकार - चित्रगीत लोकगीत