A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धरित्रीच्या कुशीमधे

धरित्रीच्या कुशीमधे
बियबियाणं निजली
वर पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय डरारे भूमीत
सर्व कोंब आले वर
गहिवरलं शेत जसं
अंगावरती शहारं

ऊनवार्‍याशी खेळता
एका एका कोंबांतून
प्रगटली दोन पानं
जशी हात ती जोडून

टाळ्या वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा
होऊ दे रे आबादानी

दिसामासा होय वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाला बहर
झाली शेतामध्ये दाटी

कशी वार्‍यानं डोलती
दाणे आले गाडी गाडी
देव अजब गारुडी
देव अजब गारुडी
आबादानी - भरभराट.
कारोन्या - करुणा.
खेयता - खेळता.
गह्यरलं - गहिवरलं.
जोडिसन - जोडून.
टाया - टाळ्या.
पर्गटले - प्रकटले.
माटी - माती.
वर्‍हे - वर.
मूळ रचना

धरत्रीच्या कुशीमधी
बीयबियानं निजली
वर्‍हे परसली माटी
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले व‍र्‍हे
गह्यरलं शेत जसं
आंगावरती शहारे

ऊन वार्‍याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी
जसे करती कारोन्या
होऊ दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वार्‍यानं डोलती
दाने अले गाडी गाडी
दैव केलं रे उघडी
देव अजब गारोडी

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.