A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रेशमाच्या रेघांनी

रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नका लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियले राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नका लावू माझ्या साडीला !

जात होते वाटंनं मी तोर्‍यात
अवचित आला माझ्या होर्‍यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढिला?
हात नका लावू माझ्या साडीला !

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला
हात नका लावू माझ्या साडीला !
कशिदा - वस्‍त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम.
मुरवत - भीड / संकोच / पर्वा.
शेव - टोक, काठ.
होरा - भविष्य, अंदाज.
संगीत दिग्‍दर्शकाने दिलेल्या चालींवर गीतरचना करणे, गीत 'बांधणे' या गोष्टीवर अनेक जणांचा आक्षेप असल्याचे माझ्या निदर्शनाला आले आहे. कित्येकांना त्यामुळे गीतरचनेत यांत्रिकता, कृत्रिमता येत असावी अशी शंका येते, तर कित्येकांना त्यामुळे गीतकाराचे स्थान संगीत दिग्‍दर्शकाच्या तुलनेत दुय्यम ठरत असल्याची खंत वाटते. इतक्या वर्षांच्या गीतलेखनाच्या अनुभवाने माझे या बाबतीत काय मत आहे, त्याचा खुलासा केल्यास तो अप्रस्तुत होणार नाही.

गीतकाराने प्रथम गीत लिहावे आणि संगीत दिग्‍दर्शकाने गीतातील भावनेशी संवादी अशी चाल त्याला द्यावी, ही सरळ आणि कुणालाही सहज पटण्याजोगी पद्धती आहे. पण गीतरचनेची तीच एक आदर्श आणि एकमेव पद्धती आहे, असे मात्र म्हणता येणार नाही. चालीवर गीतेच नव्हेत, कविता देखील लिहिल्या जातात. कवी जेव्हा विशिष्ट वृत्तात, जातीत किंवा छंदात कविता लिहितो, तेव्हा ती एका परीने चालीचे बंधन पतकरूनच लिहिलेली असते. पण चालीवर चित्रपट गीते लिहिण्याच्या बाबतीत दुसरी जी अधिक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते, ती ही, की प्रस्तुत परंपरा आपल्या नाट्यसंगीतापासून चालत आलेली आहे. आपले बहुतांश नाट्यसंगीत हे शास्‍त्रीय गायकांनी दिलेल्या रागदारीच्या चिजांवर किंवा बंदिशींवर बांधलेल्या गाण्यांनी सिद्ध झालेले आहे. गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले, रामकृष्णराव वझे, बाई सुंदराबाई, मास्टर कृष्णराव, केशवराव भोळे अशा शास्‍त्रीय संगीताच्या जाणकारांनी त्या संगीतातून सुंदर सुंदर चाली निवडाव्यात आणि नाटककारांनी त्यावर शब्द 'टाकावेत', अशी आपल्या नाट्यसंगीतात सर्रास प्रथा होती. देवल, किर्लोस्कर या आद्य मराठी नाटककारांनी कीर्तनात प्रचलीत व लोकप्रिय असलेल्या साकी, दिंडी, आर्या यांचा गीतलेखनासाठी वापर केला. तर कधी पारंपारिक लावण्यांच्या ठसकेबाज चालींवरही गीते लिहिली. रागदारी संगीताचा नाटकांतून उपयोग करण्याची पद्धती अगदी अलिकडच्या काळात वसंत देसाई, जितेंद्र अभिषेकी यांच्यापर्यंत चालू राहिली आहे. मराठी नाटकांची ही संगीत परंपरा पुढे चित्रपटांनीही अवलंबिली. आपली 'प्रभात'पासूनची अनेक सुंदर चित्रपट गीते या गोष्टीची साक्ष देतील.

ही सर्व माहिती विस्तारपूर्वक इथे सांगण्याचे प्रयोजन इतकेच, की चित्रपटात गीते लिहिताना ती पूर्वनियोजित चालींवर लिहिण्यामध्ये काहीही गैर नाही किंवा गीतांत त्यामुळे कृत्रिमता येते, गीतकाराला संगीत दिग्‍दर्शकापेक्षा दुय्यम स्थान मिळते, तो स्वत:च्या कलात्मक वृत्तीशी तडजोड करतो, अशातलाही काही भाग नाही. हे मी स्वत:चे समर्थन करण्यासाठी लिहित नाही. मला स्वत:ला चित्रपटांसाठी गीते लिहिताना दोन्ही प्रकारचे संगीत दिग्‍दर्शक भेटले. सुधीर फडके, राम कदम, यशवंत देव यांसारख्या संगीत दिग्‍दर्शकांना गीते आधी लिहून हवी असतात आणि मग ते त्यांना अनुरूप असा स्वरसाज ते चढवतात तर हृदयनाथ मंगेशकर, विश्वनाथ मोरे, सलिल चौधरी अशा संगीतकारांनी अनेकदा आधी चाली बांधल्या आणि मग मी त्या चालींवर गीते लिहिली. मला दोन्ही प्रकार आवडतात आणि चालींवर गीत लिहिणे ही मला तडजोड वाटण्याऐवजी ते एक सुंदर आव्हान वाटते. माझी काही खूप लोकप्रिय झालेली गीते चालीबरहुकूम बांधलेली आहेत. 'रेशमाच्या रेघांनी' ही लावणी लताबाईंच्या संगीत दिग्‍दर्शनाखाली 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटासाठी मी लिहिली. त्या गीतासाठी एक कानडी चाल लताबाईंनी मला दिली होती. तर 'अपर्णा तप करिते काननी' या गीताची चाल 'कुठे तुझे पंचपती दावि गे मला' या आपल्या आजीच्या एका गीताच्या चालीत थोडा फेरफार करून लताबाईंनी तयार केली होती. ही दोन्ही गाणी माझ्या आवडीची आहेत.

लताबाई या माझ्या आवडत्या संगीतकार. नुसत्या संगीतकारच नव्हेत तर इतरही बर्‍याच काही. त्यांच्याबरोबर काम करणे हा एक प्रसन्‍न अनुभव, एक आनंदोत्‍सव आहे. 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटाची गाणी मी त्यांच्याबरोबर करत होते, तो काळ इतका सुखात गेला, की त्याचे स्मरणही मनात एक हुरहूर जागी करते. प्रारंभी मला त्यांची भीती वाटे; पण त्यांनी अतिशय सौजन्याने मला वागवले आणि माझ्या मनावर कसलाही ताण येऊ न देता माझ्याकडून सहजपणे गाणी लिहवून घेतली. त्यांच्या चालींना खास मराठीपण असते आणि पारंपारिक गोडव्याने त्या नटलेल्या असतात.
(संपादित)

शान्‍ता शेळके
'चित्रगीते' या गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- उत्‍कर्ष प्रकाशन, पुणे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख