A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धुंद आज डोळे

धुंद आज डोळे, हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली?

जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली
बंडखोर वारा तुला शीळ घाली !

नको दूर जाऊ सखी थांब थोडी
किनार्‍यास भेटे अशी लाट वेडी
तुझी पापणी का झुके आज खाली?
घडी मीलनाची तुषारात न्हाली !

तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा
फुटावा कळीला दंवाचा शहारा
हवे ते मिळाले अशा रम्य काली
नवी रूपराणी, नवा साज ल्याली
पारवा - कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.