A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धुंद मधुमती रात रे

धुंद मधुमती रात रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे !

जललहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा
अलि रमले कमलांत रे

ये रे ये का मग दूर उभा
ही घटिकाही निसटुनी जायची
फुलतील लाखो तारा परि
ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनी
कटिभवती धरी हात रे
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - कीचकवध
राग / आधार राग - भूप
गीत प्रकार - चित्रगीत
अलि - काळा भुंगा.
कटि - कंबर.
सुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.
सदाबहार 'धुंद मधुमती रात रे' गाण्याची रम्य स्मृती !

दिवस कसे पाखरासारखे भुर्रकन उडून जातात ! भारतरत्न लता मंगेशकर उर्फ लतादीदी निवर्तल्या त्या घटनेस ६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण झाले या गोष्टीवर अजूनही आपला विश्वास बसत नाही. अवकाशातील अगणित तारकांप्रमाणे लतादीदींचे स्वरचांदणे सर्वदूर पसरलेले आहे. दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेल्या त्यांच्या अलौकिक स्वरांतून त्या अजरामर झालेल्या आहेत. समस्त भारतीयांना प्रिय असणाऱ्या लतादीदींचे गाणे रेडियो, दूरदर्शन असे कुठे ना कुठे ऐकायला मिळतेच. शिवाय, तो दैवी स्वर कानात सतत रुंजी घालत असल्यामुळे लताजींचे कुठले ना कुठले दिव्यस्पर्शी गाणे नकळत गुणगुणत दररोज सोनेरी क्षण अनुभवण्यास मिळतात. एकदा असंच 'धुंद मधुमती रात रे' गीताच्या आरंभीच्या अति मधुर अशा रेशीम तानांनी साद घातली आणि स्वरसम्राज्ञीने गायलेल्या त्या सदाबहार गाण्याच्या सोनेरी स्मृती जागृत झाल्या.

ही स्मृती आहे अनेक वर्षांपूर्वीची जेव्हा लता मंगेशकर यांच्या गौरवार्थ ग्रंथ काढण्याचे योजिले होते तेव्हाची ! त्यावेळी संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) यांना लतादीदींच्या गायनाबद्दल अभिप्राय देण्याची विनंती करण्यात आली आणि त्वरित मास्तरांनी पुढील आशीर्वादपूर्वक गौरवपर परिच्छेद लिहून दिला-

"मा. दीनानाथांची कन्या या नात्याने मी कित्येक वर्ष लताबाईंना दुरून ओळखत असलो तरी त्यांच्या प्रत्यक्ष परिचयाचा योग फार उशिरा म्हणजे 'कीचकवध' या चित्रपटाच्या गाण्याच्या वेळीच आला. गाण्यांचे ध्वनिमुद्रण पुण्याला होणार होते. तरीही "मास्टर कृष्णराव संगीत दिग्दर्शन करीत असतील तर मी अवश्य येईन" असे लताबाईंचे उत्तर आले व त्याप्रमाणे त्या स्वत: पुण्याला आल्या. 'उपवर झाली लेक लाडकी', 'सांगू कुणा रे कृष्णा' इत्यादी गाणी त्यांनी अत्यंत चापल्याने आत्मसात केली. आणि एकेका 'टेक' मध्ये त्याचे ध्वनिमुद्रणही करुन टाकले. याच चित्रपटातले 'धुंद मधुमती रात रे' हे गीत मात्र मुंबईला ध्वनिमुद्रित केले गेले. लताबाई दोन-तीन दिवस या गाण्याची तालीम करीत होत्या. त्यातील गंधाराची तान त्यांनी चटकन आत्मसात केली. या गीताचे ध्वनिमुद्रण झाल्यावर "आज आपण प्रभातची आठवण करून देणारे संगीत मला दिले आणि मी ते गाईले" असे तृप्त मनाने त्या म्हणाल्या. लताबाईंचे ते गुणग्राहक उद्गार ऐकून मलाही मोठा आनंद झाला. हातामध्ये गीताचा कागद घेतलेला, त्या कागदावर स्वत:च्या खास अशा खुणांनी स्वराचे बारकावे टिपलेले, यापेक्षा आणखी कसलेही साह्य न घेता सारे स्वर गळ्यातून बिनचूक काढणाऱ्या लताबाईंच्या बुद्धिमत्तेबद्दल मला विलक्षण कौतुक वाटले. तसेच चाली आत्मसात करताना त्यांचा जो निरलसपणा आणि परिश्रमशीलता मला दिसून आली त्यानेही मी चकित होऊन गेलो. या गुणी मुलीला ईश्वर दीर्घायुष्य देवो."

लतादीदी यांनी मास्तरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एकाच चित्रपटासाठी गाणी गायली अन् तो चित्रपट म्हणजे माणिक चित्र संस्थेचा 'कीचकवध'. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये निर्माण करण्यात आला. हा संपूर्ण चित्रपट पुणे येथील प्रभात स्टुडियोमध्ये चित्रित करण्यात आला. १९५९ साली भारतात सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते श्री. यशवंत पेटकर. मराठी चित्रपट आवृत्तीचे गीतकार होते कविवर्य ग. दि. माडगूळकर व पार्श्वगायक होते लता मंगेशकर आणि सुधीर फडके. तर हिंदी भाषेतील चित्रपट आवृत्तीचे गीतकार होते भरत व्यास व पार्श्वगायक होते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. म्हणजे या चित्रपटाच्या मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील आवृत्त्यांमध्ये एकच पार्श्वगायिका होती अन् त्या गायिका म्हणजे लता मंगेशकर ! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेतल्या चित्रपटांतील गीतांवर एकाच संगीतकाराने स्वरसाज चढवला होता अन् ते संगीत दिग्दर्शक होते प्रतिभाशाली कलावंत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव (मास्तर) !

या चित्रपटामधील सर्वच गाणी कमालीची लोकप्रिय झाली. यातील 'धुंद मधुमती रात रे' या गीताने तर प्रसिद्धीचा कळसच गाठला आणि कालातीत गीतांच्या पंक्तीत या गीतास अढळ स्थान मिळाले.

मास्तर कृष्णराव हे कल्पक व प्रयोगशील संगीतकार असल्यामुळे त्यांची सर्व गुणवैशिष्ट्ये कीचकवध या चित्रपटाच्या संगीतातदेखील दिसून येतात. उदाहरणार्थ, मास्तरांनी 'धुंद मधुमती' आणि त्याची हिंदी आवृत्ती असलेल्या 'आज मिलन की रात' या गाण्यांकरता चित्रपटसृष्टीत सर्वप्रथम 'हवाईयन गिटार' या सुरेल व कर्णमधुर अशा पाश्चात्य वाद्याचा प्रयोग केला. मास्तरांच्या संगीतातील इतर सर्वच प्रयोगांप्रमाणे हा प्रयोगदेखील अतिशय प्रभावी व यशस्वी ठरला. मास्तरांना गुरूस्थानी मानणाऱ्या सी. रामचंद्र यांनी हवाईयन गिटार याच वाद्याचा लगेचच 'आधा हैं चंद्रमा रात आधी' या 'नवरंग' चित्रपटातील गाण्याच्या संगीतात सुंदर वापर केला आणि मग पुढे इतर संगीतकारदेखील या वाद्याचा त्यांच्या संगीतात वापर करू लागले. लतादीदींनी धुंद मधुमती या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर “आज आपण प्रभातची आठवण करून देणारे संगीत मला दिले आणि मी ते गायले,” असे तृप्त मनाने भावपूर्ण उद्गार काढून मास्तरांच्या प्रतिभेचे पंख ल्यालेल्या दर्जेदार संगीतकलेला दाद दिली.

संगीतात सतत नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले प्रतिभासंपन्‍न कलावंत मास्तर कृष्णराव हे स्वतः उत्कृष्ट शास्त्रीय गायक, नाट्यगीत गायक आणि संगीतकार होते. नाट्यसंगीतामध्ये मास्तरांनी कालानुरूप नवता आणली तद्वत त्यांनी त्यांच्या चित्रपट संगीतात काळानुसार नावीन्य आणले. कीचकवध चित्रपटाच्या कालानुरूप दिलेल्या चाली याची साक्ष ठरतात. इतक्या वर्षांचा काळ लोटला तरी लतादीदींनी गायलेल्या धुंद मधुमती या गीताची जनमानसावर चढलेली धुंदी अजूनही कणमात्र उतरलेली नाही. आजही हे गाणं गुलाबाच्या ताटव्याप्रमाणे सुंदर, प्रसन्‍न व रसरशीत वाटते. ही किमया आहे लतादीदींच्या स्वर्गीय स्वरांची तसेच मास्तरांनी निर्माण केलेल्या अप्रतिम स्वररचनेची !

धुंद मधुमती या गाण्याच्या जादुई स्वरांनी घातलेली साद हे निमित्त ठरले आणि या अविस्मरणीय गीतासंदर्भातील गतस्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
(संपादित)

प्रिया फुलंब्रीकर
स्वरप्रतिभा दिवाळी अंक २०२३
संपादक- प्रवीण प्रभाकर वाळिंबे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.