A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिस नकळत जाई

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई

असा भरून ये ऊर जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या मग भिजुनीया जाई

आता अबोध मनाची अनाकलनीय भाषा
जशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरून राही
गीत - सौमित्र
संगीत - मिलिंद इंगळे
स्वर- अरुण दाते
गीत प्रकार - भावगीत