A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिवाळी येणार अंगण सजणार

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभांत सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा-गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षासरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

सनईच्या सुरांत होईल पहाट, अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला, आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

देवापाशी मागेन एकच दान, भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट, नको करू ताटातूट
चंद्रज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर- अनुराधा पौडवाल
चित्रपट - माझा मुलगा (१९७६)
गीत प्रकार - चित्रगीत
चंद्रज्योती - चंद्रजोती. चंद्रासारखा प्रकाश देणारे दारुकाम (भुईनळा, चक्र, इ.)

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.