दो दिवसांची तनु ही साची सुरतरसाची करुनि मजा
गमजा करितां मनिं उमजाना हें सुख न पुढें पडेल वजा
पाट बसाया ताट रुप्याचें दाट त्यामध्यें दुधरवा
धना वयाला बसेल घसरा मग विसरा हो गोड खवा
सगेसायरें वंचक चोरें जंवर मिळवितां तंवर थवा
शितें तंवर तीं भुतें भोंवतीं कोण कुणाचा सखा जीवा
जोंवरि पैसा तोंवरि बैसा मंचकिं म्हणतिल घ्याल हवा
बेटाबेटी हातिं नरोटी देतिल हा खुब समज ठिवा
हरिसि भजा, हात जोडितों हरिसि भजा
गीत | - | शाहीर रामजोशी |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | जयराम शिलेदार |
चित्रपट | - | लोकशाहीर राम जोशी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
जंवर | - | जोपर्यंत. |
तंवर | - | तोपर्यंत. |
नरोटी | - | करवंटी / भिक्षापात्र. |
वंचक | - | फसव्या. |
वज | - | उपयोग / सोय. |
साच | - | खरे, सत्य. |
दो दिवसांची तनु ही साची सुरतरसाची करुनि मजा
गमजा करितां मनिं उमजाना हें सुख न पुढें पडेल वजा
भाइ सावध व्हा
आजउद्यांचा पूर नद्यांचा वयलगद्यांचा बहर नवा
उलट्या झाल्या कुलटा रांडा मग कोठिल हो मालपुवा
थाट बसाया पाट रुप्याचे ताट त्यामध्यें दूधरवा
धना वयाला बसेल घसरा मग विसरा हो गोड खवा
रांडापोरें वंचक चोरें जंवर मिळवतां तंवर थवा
शितें तंवर तीं भुतें भोंवतीं कोण कुणाचा सखा जीवा
जोंवरि पैसा तोंवरि बैसा मंचकिं म्हणतिल घ्याल हवा
बेटाबेटी हातिं नरोटी देतिल हा खुब समज ठिवा
पातकांत कीं घात होतसे हात जोडितों हरिसि भजा
फुका सुखाला मुकाल कथितों न कालचा दिन आज दुवा
भाइ सावध व्हा
कनकधनाचा मद मदनाचा ओसरल्यावर रंग फिका
रुका न पदरीं विकाल घर मग विलास भरजरि कुठुन हुका
गजरथघोडा कलगीतोडा पायीं जोडा लालझुका
तोडा जाउन खोडा येइल बसल एकादा धरमधका
सुगंधशाला नरम दुशाला गरम मसाला पान पका
हारतुरे हे बरे न पुढतीं बुरे हाल खेळाल बुका
कोकशाळा नाटकशाळा दासी यांचा घ्याल मुका
कामुक होउनि कां मुकतां परमार्थसुखाला देह विका
कदममुलाजा यांत भुला जा तुम्हां न लाजा मनिं समजा
दूत यमाचे मूत आणितिल नेला तुमचा बाप अजा
भाइ सावध व्हा
पुरे करा या मौजा तेथुनि फौजा झाल्याचि रवाना
यमदूतांची ढाल बिनीवर बालसफेदी देखाना
पुढें यमाचे खडे दूत हे बडे हरामी समजाना
मार मारतिल फार कुणी मग मामा काका गवसेना
रांडा आतां मांडा चारिति खांडा म्हणतिल करा चुना
मूल कुणाचें भूल तुम्हांला चूल चालती तंवर म्हणा
तडका येतिल अडका सारे हुडकायाला मरतांना
पीठ गिळेना मीठ मिळेना ऐसें करितिल ऐकाना
वेडा होइल परिजन वेडा म्हणतिल पेढा आठिव जा
अडाल भूवरि पडाल मग तुम्हि रडाल न म्हणा काळ खुजा
भाइ सावध व्हा
सुभा करुनि मनसुभा येखादा उभा करा परिवार भरा
काय तुम्हांला यांत सांचलें आंत वांचलें आयु धरा
दारजनाला हार नगांचे भार मुलिस मुलग्यास तुरा
द्याल पुन्हा जरि घ्याल न देतिल तुम्हांस त्यांतिल जरा चुरा
कां मरतां धनलोभें फिरतां पुरता याचा शोध करा
कोण तुम्हांला वाली तो वनमाली लाविल पैलतिरा
लोहघनाच्या जाड कवाडा आड बसा कीं बाड चिरा
काळ सखत पाताळतळांतुनि काढिल अंबुधिमाजिं शिरा
फार कशाला सार सांगतों बारबार जन्मा न वजा
कविरायाचा बोल नव्हे कीं फोल डोल ध्यानीं उमजा
भाइ सावध व्हा
संदर्भ-
म. वा. धोंड
मर्हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.