A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका

ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे
डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे

मज उगा वाटतें वनीं विहारा जावें
पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें
कानांत बासरी वंशवनांतिल वाजे

वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें
मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे
चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें

वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं
घागरी कटिवर, करांत घ्यावी झारी
मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें

वाटतें खणावें, कंदमुळें काढावीं
तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं
चाखून बघावें अमृतान्‍न तें ताजें

सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं
गळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं
करतील गर्जना दुरुन वनाचे राजे

घेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं
वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं
पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें

वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं
वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी
लालिमा मुखावर यावा पावकतेजें

कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा?
एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा
का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र पिलू
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ५/४/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा.
अध्वर्यू - ऋत्‍वीज्‌. यज्ञकर्म करण्यासाठी नेमलेला प्रमुख ब्राह्मण.
कटि - कंबर.
चोज - लाड / कौतुक.
जधीं - जेव्हां, ज्या दिवशी.
प्रकांड - उत्‍कृष्ट.
पावक - अग्‍नी.
भाता - बाण ठेवण्याची पिशवी.
मंजिरी - मोहोर, तुरा.
वेदि - उंच आसन / ओटा.
वल्कल - वृक्षाच्या सालीचे केलेले वस्‍त्र.
वंशवन - वेणुवन, बांबूचे वन. (वंश-बांबू)
श्वापद - जनावर.

 

  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण