A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दूरच्या रानात केळीच्या

दूरच्या रानात
केळीच्या बनात
हळदिवे ऊन्ह गर्द
पिवळ्या पानात.

झिळमिळ झाडांच्या
झावळ्या दाटीत
पांदीतली पायवाट
पांगली पाण्यात.

झुलत्या फांदीच्या
सावुल्या पाण्यात
काचबिंदी नभ उभं
सांडलं गाण्यात.

लखलख उन्हाची
थर्थर अंगाला
हरवल्या पावलांची
कावीळ रानाला.

दूरच्या रानाला
लागीर उन्हाला
पारंबीचा झुला गेला
झुलत नभाला.
झावळी - सावळी / अंधार.
झिळमिळी - झिरमिळी.
पांदी - मार्ग.
लागीर - पूर्ण वेडावून जाणे.
हळदिवा - पिवळा.
पंधरा वर्षांपूर्वी एक तरुण माझ्याकडे आला. कविता, गीत, संगीत असं खूप भरभरून बोलत होता. ओळख नसली तरी कवितेच्या प्रेमापोटी जवळचा, ओळखीचा वाटला. "मी सांगली जिल्ह्यातील एक लहान गावाचा. मला लहानपणापसून गाण्याची, कवितेची, संगीताची आवड आहे. मी पाटील. मला पुण्यात काही गीत-संगीताचं काम करायचं आहे. मी भरपूर मेहनत घेतो आहे. पण पुण्यात कोणी जवळही करत नाही. हसतात. पाटील मंडळीचं हे काम नाही, असं पुण्याचे समजतात. मग मी या क्षेत्रातल्या नव्या नव्या ठिकाणी नाव बदलून गेलो. पाटीलकी लपवली. हर्षित अभिराज असं नाव धारण केलं. थोडी थोडी वाट मिळाली. मला संगीताचं काम द्यायला काही तयारही झाले. पण या क्षेत्रात सामान्य कवीचं, गीतकाराचं चालत नाही. नाव असलेला कवी, गीतकार हवा. मी फिरलो. कोणी दाद देत नाही. तुमच्या कवितांवर मी खूप प्रेम केलं आणि त्या माझ्या खेड्यातल्या शेतीतल्या आहेत. सर्वत्र सध्या तुमचं नाव आहे. मला आठ तरी कविता पाहिजेत." मी शांतपणे ऐकत होतो. तो दुरून आला होता.

खूप शोधून त्याला आठ कविता दिल्या. उत्तमोत्तम कविता. गगनात न मावणारा त्याचा आनंद मी पाहिला.
दूरच्या रानात
केळीच्या बनात
हळदिवे ऊन्ह गर्द
पिवळ्या पानात.

झिळमिळ झाडांच्या गर्दीत ती पायवाट गर्दीत हरवते. काचबिंदी नभ अशी तिची प्रतिमा. ती पाण्यात उतरते. तिच्या हरवलेल्या पावसांची 'रानाला' कावीळ. आणि लागिरं झालेली तिची-त्याची एकरूप होण्याची चित्रमयी कविता.
कविता काहीच सांगत नाही. ते गूढ रसिकांच्या मनात विस्तारत जातं. केवळ निसर्गप्रतिमांच्या सुंदर ओळींमधून. याचं गीत हा कसं बांधणार.. मला प्रश्‍न होता. त्याने संगीताच्या सगळ्या शक्यता सोप्या पद्धतीने वापरून शब्दच महत्त्वाचे, अशी चाल दिली. वैशाली सामंतने ती छान गायली आहे, तिची गाण्याची वेगळी प्रकृती असतानाही.
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख