A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एक वेस ओलांडली

एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले

इथेच मधेच क्षणैक उगाच का मी थांबलो
सावलीत माझिया एकटा विसावलो
पुन्हा उन्हात चाललो
एक वेस ओलांडली, गाव एक दूर चालले

उसासे फुलांचे खुलासे सणांचे का मी ऐकतो
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो
पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो गाव दूरदूर थांबले
एक वेस ओलांडली

संपल्या जुन्या खुणा जरी नवा ठसा दिसे
प्रवासी पुन्हा हाच खेळ संचिती असे
एक वेस ओलांडता गाव नवे दिसू लागले
एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले
गीत - नितीन आखवे
संगीत - श्रीधर फडके
स्वर- श्रीधर फडके
गीत प्रकार - भावगीत
वेस - गावकुसाचा मोठा दरवाजा, घराचे मोठे दार.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
स्पंदन - कंपन, आंदोलन.