A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
एकवार तरी राम दिसावा

हे श्रीरामा, हे श्रीरामा
एक आस मज एक विसावा
एकवार तरी राम दिसावा, राम दिसावा

मनात सलते जुनी आठवण
दिसतो नयना मरता श्रावण
पिता तयाचा दुबळा ब्राह्मण
शाप तयाचा पाश होउनी आवळितो जीवा

पुत्रसौख्य या नाही भाळी
परि शेवटच्या अवघड वेळी
राममूर्ति मज दिसो सावळी
पुत्र नव्हे तो अंश विष्णूचा वरदाता व्हावा

मुकुट शिरावर कटी पीताम्बर
वीर वेष तो श्याम मनोहर
सवे जानकी सेवातत्पर
मेघःशामा, हे श्रीरामा रूप मला दावा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत देसाई
स्वर- आशा भोसले
चित्रपट - मोलकरीण
राग - तोडी
गीत प्रकार - राम निरंजन, चित्रगीत
कटि - कंबर.
श्रावण - एक वैश्य. यांस दशरथाकडून अनवधानाने मृत्यू आला असता त्याच्या मातापित्यांनी दशरथास "तू पुत्रशोक करत मरशील." असा शाप दिला.
सल - टोचणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.