A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गडद निळे गडद निळे

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.

दिन लंघुनि जाय गिरी
पद उमटे क्षितिजावरि
पद्मरागवृष्टि होय माड भव्य न्हाले.

धुंद सजल हसित दिशा
तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचें धन घनांत बघुनि मन निवालें.

रजतनील, ताम्रनील
स्थिर पल जल, पल सलील
हिरव्या तटिं नावांचा कृष्ण मेळ खेळे.

मीन चमकुनी उसळे
जलवलयीं रव मिसळे
नवथर रसरंग गहन करिति नयन ओले.

टप, टप, टप पडति थेंब
मनिंवनिंचे विझति डोंब
वत्सल ये वास, भूमि आशीर्वच बोले.