A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रावण आला ग वनी

श्रावण आला ग वनी, श्रावण आला !
दरवळे गंध मधुर ओला

एकलीच मी उभी अंगणी
उगीच कुणाला आणित स्मरणी
चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला

बरसू लागल्या रिमझिम धारा
वारा फुलवी मोर पिसारा
हलू लागली झाडेवेली, नाच सुरू जाहला

उरात नवख्या भरे शिरशिरी
शीर शीर करी नृत्य शरीरी
सूर कुठून ये मल्हाराचा, पदर कुणी धरिला

समीप कुणी आले, झुकले
किती धिटावा, ओठ टेकले
मृदुंग की ती वीज वाजते, भास तरी कसला