A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गंगा आली रे अंगणी

गंगा आली रे अंगणी

बारा महिने तेरा काळ
रानोमाळी सुगी सुकाळ
चतुरपणाने करा गड्यांनो,
चतुरपणाने करा जळाच्या पाटाची आखणी

भूमीवरच्या भागीरथीला
स्वर्गंगेचा ओघ मिळाला
ऐसे माहात्म्य गंगेचे
पाणी पाणी जिकडेतिकडे, सौख्याची श्रावणी

सुंबरानं मांडिलं गा बिरोबा या देवाचं
आबाळाच्या पित्याचं गा धरीतरी मातेचं

पिकून पिवळी झाली धाटं
घुमवा भलरी भल्या पहाटं
भलरी भलरी भलरी दादा भलगडी दादा
करा कापणी काढा दौलत, साधा हो पर्वणी

यंत्र चालवा गाळा ऊस
अमाप पिकला घ्या कापूस
वेचा कापूस वेचा ग वेचा कापूस वेचा
दूध विकाया पुन्हा निघाल्या गोकुळच्या गौळणी

युग यंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे
घाम न आता पडो कुणाचा, कोठे निष्कारणी

दळिद्र गेले पळुनी पार
फळाफुलांना आला बहार
नांदाया ती येई लक्ष्मी स्वर्गीची पाहुणी

गंगा आली, लक्ष्मी आली अंगणी
धाटं - ज्वारी, बाजरी, मका, इ. पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेला कणिसाखालील भाग.
बिरोबा - धनगर समाजाचे कुलदैवत.
सुंबरान - धनगरी भाषेत देवाचे स्मरण.
दत्ता डावजेकरांचे भाग्य असे की त्यांना ग. दि. माडगूळकरांसारखे सिद्धहस्त कवि लाभले.

हे गीत समूहाने गायले आहे. भारतीय संगीताला समूहगीतांचे थोडेसे वावडेच ! वैयक्तिक गायनाकडे लक्ष अधिक केंद्रिभूत ! या कारणांमुळेच वाद्यमेळ व समूहगीत या दोनही कल्पना बर्‍याचशा पाश्चात्य संगीताकडून उचललेल्या ! त्यात डावजेकरांना इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग करून नवीन नवीन संगीतोपयोगी साधने निर्माण करण्याची आवड व त्या साधनांचा योग्य जागी योग्य वापर करण्याची हातोटी पण साधलेली. या सर्व गोष्टींचा सामूहिक परिणाम 'गंगा आली रे' या गीतामध्ये अनुभवाला येतो व त्यामुळेच हे गीत उच्च दर्जाचे समूहगीत बनले आहे.
(संपादित)

सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अपर्णा मयेकर, गोविंद पोवळे, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर, एच. वसंत