A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गाउं त्यांना आरती

संगरीं वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटीं
जन्मले या भारतीं.
राष्ट्रचक्रोद्धारणीं कर्णापरी ज्यांना मृती
गाउं त्यांना आरती.

कोंदला अंधार मार्गीं खांचखड्डे मातले
तस्करांनीं वेढिलें,
संभ्रमीं त्या जाहले, कृष्णापरी जे सारथी
गाउं त्यांना आरती.

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनीं जीवितीं
तो परार्थी पाहती,
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती
गाउं त्यांना आरती.

देश ज्यांचा देव, त्याचें दास्य ज्यांचा धर्म हो
दास्यमुक्ति ध्येय हो,
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती
गाउं त्यांना आरती

देह जावो, देह राहो, नाहिं ज्यांना तत्‌क्षिती
लोकसेवा दे रती,
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती
गाउं त्यांना आरती

जाहल्या दिङ्मूढ लोकां अर्पिती जे लोचनें
क्षाळुनी त्यांचीं मनें
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती, ज्यांच्या स्मृती
गाउं त्यांना आरती

नेटकें कांहीं घडेना, काय हेतु जीवना
या विचारीं मन्मना
बोधितों कीं एवढी होवो तरी रे सत्कृति
गा तयांची आरती.
अग्रणी - नेता, मुख्य.
क्षालणे - धुणे.
क्षिती - फिकीर.
कोंदणे - भरून जाणे.
तस्कर - चोर.
दिङ्मूढ - आश्चर्यचकित, स्‍तंभित.
परार्थी - अन्य हेतु.
मृति - मरण, मृत्यू.
मेरू - एक पर्वत.
मार्कंडेय - एक ऋषी. आपण अल्पायुषी आहो असे कळल्यावर यमदूत आले असता यांनी शंकराच्या पिंडीस विळखा घालून धांवा केला. तेव्हां शंकराने यांना वाचवून उदंड आयुष्य दिले. / दीर्घायुष्य.
संक्षेप देणे - कमी करणे, भाग (अंकगणितातील) देणे.
संगर - युद्ध.
सत्‍कृति - चांसले काम / पुण्य.
सौभद्र - सुभद्रापुत्र- अभिमन्यु / सुभद्राहरणसमयी झालेले युद्ध.