A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गेला दर्यापार घरधनी

गेला दर्यापार,
घरधनी, गेला दर्यापार !

पुरती ओळख नव्हती झाली
अंगाची ना हळद निघाली
अजुनी नाही देवक उठलं
नाही उतरला गौरीहार !

पलटण घेउनी बोट चालली
परतुनी राया कधी येणार?
संसाराची स्वप्‍नं माझी
अशीच का रे विरघळणार?

डोळ्यांमधुनी झरती धारा
धीरही सुटला पार
घरट्याभवती मूक पाखरू
असंच कुठवर भिरभिरणार?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
गौरीहर - लग्‍नाच्या दिवशी वधू शिवपार्वतीची पूजा करते ती पूजा किंवा मूर्ती.
देवक - लग्‍न, मुंज आदि कार्याचे सिद्धार्थ स्थापिलेली देवता.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.