A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देवता कामुकतारहिता

देवता कामुकतारहिता । कां न होय कार्यवरद ॥

जी रुसते प्रेमरता । शांतकाल पाहतां । कालगुणें कठिण बने ।
धांवे निजबलें परि हरि भया । निरामया करित ॥
गीत - य. ना. टिपणीस
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार- भार्गवराम आचरेकर
अजितकुमार कडकडे
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - शहा-शिवाजी
चाल-देव तेथे विलसे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
शिवचरित्र हें एक दुसरें महाभारत आहे. 'चंद्रग्रहण' नाटकाचें आदरातिथ्य महाराष्ट्रीय रसिक प्रेक्षकांनी व वाचकांनी अत्यंत प्रेमानें केल्या कारणानें हे नाटक लिहिण्यास उत्तेजन आलें. हें नाटक मूळ 'आर्यावर्त नाटक मंडळी'करितां गद्यस्वरूपातच लिहिण्याचा विचार होता; परंतु दोनवर्षापूर्वी ती मंडळी बंद झाल्यावर ललितकलादर्श संगीत नाटक मंडळीचे मालक श्री. केशवराव भोंसले यांनीं तें संगीतरूपांत रंगभूमीवर आणण्याची इच्छा दर्शविली. त्यांच्या इच्छेप्रमाणें हें नाटक तयार करून त्यांच्या मंडळीकडूनच ते रंगभूमीवर येत आहे. हा योग घडवून आणण्यास माझे मित्र सुप्रसिद्ध नाटकार श्री. भार्गवराम वि. वरेरकर हे सर्वांशी कारण झाले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

'चंद्रग्रहण' नाटकाच्या वेळीं मी जसा अज्ञातवास भोगला त्यापेक्षांही खडतर अज्ञातवास मला या नाटकाच्या लेखनप्रसंगीं सोसावा लागला. या काळांत माझ्या ज्या प्रेमळ मित्रांनीं माझी मन:स्थिति संतोषित ठेवण्याचा प्रयत्‍न केला त्यांत माझे मित्र व महाराष्टाच्या परिचयाचे नाटककार श्री. विश्वनाथराव शेट्ये, विनायकराव पाठारे, श्री. आत्मारामपंत कापडी, व श्री. माधवराव आगाशे बुकसेलर व पब्लिशर, रा. सिताराम दा. गोंधळेकर, इ. मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे.

संगीत नाटकाचा यशस्वीपणा गोड व नवीन चाली यावर बराच अवलंबून असतो. श्री. केशवराव भोंसले यांच्याकडून मला तशाप्रकारची मदत होईल, याबद्दल शंकाच नव्हती; परंतु दुधांत साखर पडावी याप्रमाणें सुप्रसिद्ध गायनाचार्य प्रो. रामकृष्णबुवा वझे यांनीं अत्यंत उदारपणानें; व श्री. केशवराव भोंसले यांच्या विषयीं त्यांच्या मनांत वसत असलेल्या शिष्यप्रेमानें, योग्य चालींची निवड करून जें सहाय केलें त्याबद्दल श्री. केशवराव भोंसले व मी स्वतः त्यांचे अत्यंत आभारी आहोत. प्रो. वझेबुवांच्यापाशीं नाटकाला योग्य अशा चालींचा समुद्रासारखा संग्रह आहे. त्यांचा उपयोग नाटककार व नाटकमंडळ्या करून घेतील तर महाराष्ट्र रंगभूमीस श्रीमंती येऊन ती आपल्या वैभवानें इतर रंगभूमींना दिपवून टाकील यांत शंका नाही.

नट असतांनाच मी नाट्यलेखन करूं लागलों; व परमेश्वराच्या कृपेनें मला त्यात थोडेबहुत यशहि आले. माझ्याप्रमाणेंच प्रयत्‍नानें नाट्यलेखन करूं लागतील असे कांहीं नट मराठी रंगभूमीवर आहेत, असा माझा समज आहे. ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींत अशा प्रकारचे गुण खुद्द त्या मंडळीचे मालक श्री. केशवराव भोंसले यांच्या ठिकाणीं असल्याचें परिचयानें मला आढळून आलें. या 'शहा-शिवाजी' नाटकांत यांनीं रचलेलीं तीन पदें, 'शांतिधना मानसा', 'खला तुला तुलाचना', व 'ये जगिं प्रलयकाल' मी मोठ्या आनंदानें घालीत आहे. हीं पदें निःसंशय प्रासादिक असून, यशस्वी संगीत नाटककाराला साजेशींच तीं आहेत, याबद्दल कोणाचीही खात्री होईल. त्यांनीं हा व्यासंग बंद पडूं न देतां नटाच्या शाखेंतूनच यशस्वी नाटककार निर्माण होतात, याचा अनुभव सर्वांना आणून द्यावा. तसेंच याच मंडळीतील प्रसिद्ध नट श्री. पेंढारकर यानीं रचलेली दोन पदें, 'केवि जीवा जीवीची' व 'प्रमदमया माया' होतकरू नाटककाराचे गुण पूर्णपणें दाखवीत आहेत, असें म्हणण्यास मठा मुळींच हरकत वाटत नाही. तसेंच, नटवर्य श्री. दत्तोबा भोंसलें यांनीं रचलेलें ईश्वरभक्ति विषयक पदहि मी मोठ्या आनंदानें या नाटकात घालीत आहे. या नाटकांतील पद्यांच्या बाबतींत माझे मित्र श्री. भार्गवराम वरेरकर यांचे मला बिनमोल सहाय झालें, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

श्री. शिवछत्रपतीच्या कृपेने सर्वांच्या ऋणांतुन मुक्त होण्याचें सामर्थ्य मला मिळो, अशी प्रार्थना करून मी ही प्रस्तावना संपवितों.
(संपादित)

यशवंत नारायण टिपनीस
शिवशक २४६ १ वैशाख शुद्ध २
'शहा-शिवाजी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- यशवंत नारायण टिपनीस (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  भार्गवराम आचरेकर
  अजितकुमार कडकडे
  आशा खाडिलकर