A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घाल घाल पिंगा वार्‍या

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परि मन खंतावतं !

विसरली का ग भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं.

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय.. !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !
गीत - कृ. ब. निकुंब
संगीत - कमलाकर भागवत
स्वराविष्कार- सुमन कल्याणपूर
कालिंदी केसकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• स्वर- सुमन कल्याणपूर, संगीत- कमलाकर भागवत.
• स्वर- कालिंदी केसकर, संगीत- ए. पी. नारायणगांवकर.
चंद्रकळा - फक्त काळ्या रंगाची साडी.
परसू (परसदार) - घराच्या मागील खुली जागा.

 

Random song suggestion
  सुमन कल्याणपूर
  कालिंदी केसकर