A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घरदिव्यांत मंद तरी

घरदिव्यांत मंद तरी
बघ, अजून जळते वात;
उजळल्या दिशा, सजणा,
न कळतांच सरली रात !

झाडतां झडेना या
लोचनांतली पण धुंद.
सर्व रात्रभर निजला,
जिवलगा, कळींत सुगंध !

जवळपास वाटेनें
सुभग चालली कोणी :
वाजतें तिच्या भरल्या
घागरींतलें पाणी.

निवळलें, तरी दिसतो
पुसट एक हा तारा;
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा !

झोप तूं : मिठीमधला
अलग हा करूं दे हात;
उलगडूं कशी पण ही
तलम रेशमाची गांठ?
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - गजानन वाटवे
स्वर- उषा अत्रे-वाघ
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४०.
सुभग - दैवी / सुंदर.
गजानन वाटवे ओळखीचे होते; पण भेट व्हायची ती नेहमी औपचारिक समारंभांत. त्यांच्या घरी पहिल्यांदा गेले, ती त्यांची गाणी ऐकण्यासाठी. मी आणि शांताबाई शेळके. आम्ही दोघी गेलो आणि पुढ्यात पेटी घेऊन वाटवे त्या दिवशी खूप गायले. माझ्या पिढीकडून त्यावेळी फारसे वाचले न जाणारे कितीतरी कवी त्यांनी ऐकवले. शांताबाईंचं वाचन आणि कविताप्रेम उदंड आणि स्मरणशक्ती अतिउत्तम. त्यांनी आठवण करावी आणि वाटव्यांनी ती कविता गावी, अशी एक सुरेख मैफल रंगली. भावकवितेनं मंतरलेल्या काळात सहज प्रवेश करून ते दोघे अगदी उल्हसितपणे तिथे रमले होते.

अनिल, काणेकर, माधव ज्युलियन, ना. घ. देशपांडे.. कितीतरी त्या दिवशी ऐकले. जी. एन. जोशींनी गायलेली आणि लोकप्रिय केलेली कितीतरी गाणी ऐकली. 'रानारानात गेली बाई शीळ..' आणि 'नदीकिनारी, नदीकिनारी..' या ना. घ. देशपांडे यांच्या कविता एकेकाळी जी. एन. जोशींनी खूप गाजवल्या होत्या. वाटव्यांनी त्या तर ऐकवल्याच, पण त्या दिवशी त्यांच्याकडून ना. घं.ची आणखी एक कविता ऐकली- 'अजून' नावाची. तिचं मधुरपण त्या दिवशी प्रथम जाणवलं.

घरदिव्यात मंद तरी
बघ, अजून जळते वात;
उजळल्या दिशा, सजणा
न कळताच सरली रात !

किती साधी, किती घरगुती सुरुवात ! पहाट झाली आहे. दिव्यातल्या न विझलेल्या वातीसारखी रात्रीच्या सुखाची तृप्ती अजून रेंगाळतेच आहे मागे. पण पहाट झाली आहे. दिशा उजळल्या आहेत. आणि रात्र नकळत सरून गेली आहे.

एवढ्याशा सुरुवातीनंच ना. घं.ची कविता जिंकली आहे. साधेपणानं एखाद्या स्‍नेहस्‍निग्ध, कुशल गृहिणीनं पतीचं मन जिंकावं, तसं या कवितेनं रसिकांचं मन जिंकलं आहे- अगदी सुरुवातीलाच. मोजकंच बोलली आहे ती. पण तिला सुचवायचं आहे, ते केवढं तरी आहे. 'न कळताच सरली रात' या लहानशा उद्गारानंच तिनं ते सुचवलं आहे. रात्र कशी सरली, ते कळलंसुद्धा नाही. पण आता पहाट झालेली कळते आहे आणि सरल्या रात्रीचा अनुभव घरदिव्यातल्या मंद उजेडासारखा अजून गात्रांमधून हलतो आहे. 'घरदिवा' या पहिल्याच शब्दानं त्या सगळ्या अनुभवाला सात्विकतेचा कसा सुंदर उजाळा मिळाला आहे पहा !

हा अनुभव बोलणारी 'ती' आहे; तो नव्हे. ती रात्रीच्या त्या उत्कटतेबद्दल बोलते. जे घडून गेलं त्यानं दिलेल्या सुखाबद्दल बोलते. पण तिची बोलण्याची रीत नाजूक आणि शालीन धिटाईची आहे. त्या सुखाच्या कोवळेपणाला जराही धक्का न लावता ती बोलायचं ते सगळंच बोलते आहे-

झाडता झडेना या
लोचनातली पण धुंद
सर्व रात्रभर निजला
जिवलगा, कळीत सुगंध !

डोळ्यांवरची मदिर धुंदी अजून उतरलेली नाही. एक मधला लहानसा प्रहर आहे हा. रातीचा रंग सरला आहे आणि दिवसाचा गजबजता व्यवहार सुरू व्हायचा आहे. त्या दोहोंमधला हा अगदी सुकुमार संधिकाल आहे. तिच्या जडावलेल्या पापण्यांवर अजून धुंदी रेंगाळते आहे. जे घडलं ते किती कोवळं, किती हवंसं आणि किती बेभान करणारं होतं, याची तिनं दिलेली साक्ष- 'कळीत निजलेल्या सुगंधाची'. कधीकधी थेट उच्चारापेक्षाही अनुच्चारिताचे आभास सूचक संदिग्धता मिरवत येतात; ते फार फार सुंदर असतात. ना. घं.च्या कवितेचं यश त्या आभासाचं इंद्रजाल निर्माण करण्यात आहे.

निवळले, तरी दिसतो
पुसट एक हा तारा
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा

भर ओसरला आहे. आवेग आता नाही. उन्माद नाही. आत आणि बाहेर दोन्हीकडेही आता निवळलं आहे. पण अजून आभाळात पुसट का होईना, एक चांदणी दिसते आहे. रात्रीची झगमगती आठवण अजून सौम्यपणे का होईना, आभाळाच्या हृदयात आहेच. वळचणीची चिमणी पुन्हापुन्हा बाहेर डोकावते आहे. हळूच चिवचिवते आहे. पिसं फुलवते आहे. कुणीतरी सुवासिन रस्त्यावरून घागर घेऊन चालली आहे. तिच्या कळशीतल्या पाण्याचा आवाज येतो आहे. शकुनाचा आवाज !

जवळपास वाटेने
सुभग चालली कोणी
वाजते तिच्या भरल्या
घागरीतले पाणी

म्हटली तर ही दृश्यं साधीच आहेत. नेहमीची. पण त्या दृश्यांवर तिच्या तृप्तीच्या काठोकाठ भरलेपणाचा सत्वशील गोडवा हलकेच पसरला आहे. 'तिला' आता उठायचं आहे. संसारातली कामं आता तिची वाट पाहतील. तिला वेढून टाकतील. त्याच्या मिठीतून आता हात सोडवून घ्यायला हवा आहे. पण त्या दूर जाण्यात, उठून जाण्यात मागे उरणारं जे गुंतलेपण आहे, रात्रीच्या अनुभवानं आतपर्यंत जे जवळपण उतरलं आहे, ते कसं दूर होईल? रेशीम जेवढं मृदू आणि तलम, तेवढी त्याची गाठ घट्ट.

उगीच हासते माझे
ललित अंतरंग सख्या !
उमलल्या फुलामधले
हालले पराग सख्या !

झोप तू, मिठीमधला
अलग हा करू दे हात
उलगडू कशी पण ही
तलम रेशमाची गाठ?

ना. घ. देशपांडे विदर्भातले. मेहेकर हे त्यांचं गाव. एका मोठ्या आजारपणात दीड-दोन महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर ते पुन्हा घरी आले. शांता त्यांची पत्‍नी. त्या दोघांचं सहजीवन फार आनंदाचं होतं. ती दोघं ज्या माडीत निजत, तिथल्या उत्तरेच्या खिडकीतून एक चाफा दिसे. रात्री वार्‍याबरोबर त्याचा सुगंध येई. पहाटे निवळत्या आभाळातली एखादी चांदणी दिसे. छपरीत चिमण्यांची चिवचिव सुरू होई. रस्त्यानं कोणी बाई कमरेवर कळशी घेऊन जायची, तिच्या पाण्याचं वाजणं ऐकू येई. जाग आली तरी उठावंसं वाटत नसे. ना. घं. नी हे सारं लिहून पुढे म्हटलं आहे- 'परस्पर स्पर्शाची धुंद लवकर झडत नाही.' हे सगळं एकदा कविता होऊन उतरलं. त्यांच्या नव्हे, तर तिच्या बाजूने या अनुभवाचा विकास म्हणजे 'अजून' ही कविता.

पती-पत्‍नी प्रेमाच्या ज्या काही मनोज्ञ कविता मराठीत लिहिल्या गेल्या आहेत, त्यांच्यामधली ही एक. ना. घं. देशपांडे प्रेमाची तरल, स्वैर, उन्मादकर आणि सौंदर्यशाली कविता लिहिणारे कवी. मात्र, या कवितेत त्यांनी प्रपंचातल्या प्रेमाची जी अति मृदु लय पकडली आहे, ती त्यांच्या इतर कवितांपेक्षा वेगळी तर खरीच; पण एक खूप तरल आणि मदिर अनुभव- त्यातला सात्विक गोडवा जसाच्या तसा राखून, त्याच्या सगळ्या नाजूक छटांसह व्यक्त करण्याची ना. घं.ची तर्‍हाही इतर मराठी कवींपेक्षा वेगळीच.

हे वर्ष ना. घं. च्या जन्मशताब्दीचं. आणि ना. घं. ची 'शीळ' कविता गाऊन भावकवितेच्या गायनाला विलक्षण लोकप्रिय करणारे पहिले गायक गोविंदराव जोशी यांच्याही जन्मशताब्दीचं. 'अजून' या कवितेची आठवण आज वाटव्यांच्या जोडीने या दोघांच्या स्मरणापाशीही ठेवावीशी वाटते.
(संपादित)

अरुणा ढेरे
सदर- कवितेच्या वाटेवर
सौजन्य- दै. लोकसत्ता (१८ एप्रिल २००९)
(Referenced page was accessed on 9 April 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.