A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घास घे रे तान्ह्या बाळा

घास घे रे तान्ह्या बाळा । गोविंदा गोपाळा ।
भरवी यशोदामाई । सांवळा नंदबाळ घेई ॥

घेई कोंडा-कणी । त्रैलोक्याच्या धणी ।
विदुराघरींचा । पहिलावहिला घास ॥

पोहे मूठभरी । क्षीराब्धीच्या हरी ।
मैत्र सुदामजीचा । आला दुसरा घास ॥

थाळी एक्या देठी । घ्यावी जगजेठी ।
द्रौपदीमाईचा । आला तिसरा घास ॥

उरल्या उष्टावळी । फळांच्या वनमाळी ।
शबरी भिल्लिणीचा । घ्या हो चवथा घास ॥

टाकू ओवाळून । मुखचंद्रावरून ।
गोविंदाग्रजाचा । उरलासुरला घास ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- बालगंधर्व
नाटक - एकच प्याला
चाल-विडा घ्या हो नारायणा
गीत प्रकार - हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत
क्षीराब्धी - (क्षीर + अब्धि:) पुराणात वर्णिलेला दुधाचा समुद्र.
विदुर - विचित्रवीर्याच्या अंबिकानामक भार्येच्या दासीला व्यासापासून झालेला पुत्र. हा नि:पक्षपाती, न्यायी व शहाणा होता.
शबरी - एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्तीण.
सुदाम - श्रीकृष्णाचा एक सवंगडी.
'एकच प्याला' हे नाटक गडकर्‍यांनी गंधर्व नाटक मंडळींसाठी लिहिले. नाटकाच्या गद्यभागाचे लेखन १९१७ सालच्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर संगीताला योग्य असे प्रसंग निवडणे, पदांसाठी चालींची निवड करणे आणि निवडलेल्या चालींना अनुसरून पद्यरचना करणे इतका व्याप शिल्लक होता. पण १९१८ सालच्या सुरवातीपासून गडकर्‍यांची प्रकृती बिघडत चालल्यामुळे, पद्यरचनेची जबाबदारी गडकर्‍यांचे मित्र आणि सुप्रसिद्ध कादंबरीकार, विठ्ठल सीताराम गुर्जर यांच्यावर सोपविण्यात आली. ईशस्तवनाचे पहिले पद आणि बाळाला दूध पाजताना सिंधूने म्हणावयाचे भावगीत (३।१) या फक्त दोन रचना गडकर्‍यांनी केलेल्या असून वाकीच्या सर्व रचना गुर्जरांनी केलेल्या आहेत. या नाटकातील सिंधूची जी पदे लोकप्रिय झाली त्यांपैकी अनेकांच्या चाली विख्यात गायिका सुंदराबाई जाधव यांनी दिलेल्या आहेत. संगीत म्हणजे 'एकच प्याला' नाटकाचा अलंकारच नव्हे तर, त्याचे सामर्थ्यही होते.

या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने २०-२-१९१९ रोजी बडोदे येथे बडोदे संस्थानचे अधिपती, सयाजीराव गायकवाड यांच्यासाठी निमंत्रितांच्या उपस्थितीत करून दाखविला. त्या प्रयोगाच्या यशाच्या वातम्या मुंबईत येऊन थडकल्यामुळे, मुंबईतील रसिक या नाटकाची अतिशय आतुरतेने वाट पाहू लागले. दुर्दैव मात्र असे की, बडोदा येथील पहिल्या प्रयोगाच्या पूर्वी म्हणजे २३-१-१९१९ रोजी गडकरी हे विदर्भातील सावनेर येथे मरण पावले होते. त्यामुळे 'एकच प्याला' नाटकातील शोकांतिकेची छाया अधिकच गडद होऊन रसिकांना विलक्षण हळहळ वाटत होती.

'एकच प्याला' नाटकाचा पहिला सार्वजनिक प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने २९-३-१९१९ रोजी मुंबई येथील ग्रँट रोड विभागातील न्यू एलफिन्स्टन नाटकगृहात करून दाखविला. त्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी गंधर्व मंडळींच्या नाटकगृहात झालेली गर्दी १९३१ सालपर्यंत ओसरली नाही.

'एकच प्याला' नाटक गंधर्व नाटक मंडळीला देण्याचे गडकर्‍यांनी निश्चित केले. त्यापूर्वी बालगंधर्वांनी विशेषेकरून संपन्‍न वातावरणातील शृंगाररसप्रधान नाटकांत भूमिका करून रसिकमनावर मोहिनी घातली होती. 'एकच प्याला' नाटकासंबंधी बोलताना गडकरी वालगंधर्वांना म्हणाले, "माझ्या नाटकात तुम्हाला फाटकं लुगडं नेसून काम करावं लागेल." एका क्षणाचाही विलंब न करता वालगंधर्व म्हणाले, "फाटकं लुगडंच काय ! गोणपाट नेसूनसुद्धा मी तुमच्या नाटकात काम करायला तयार आहे". वालगंधर्वांच्या गायनाभिनयामुळे 'एकच प्याला' नाटकातील सिंधूच्या फाटक्या लुगड्याला जरीच्या बनारसी शालूचे सौंदर्य प्राप्त झाले. गडकर्‍यांसारखा प्रतिभाशाली नाटककार आणि बालगंधर्वांसारखा असामान्य नट यांची युती, हे 'एकच प्याला' नाटकाच्या प्रयोगाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य होते !
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
'गडकर्‍यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.