A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घट तिचा रिकामा झर्‍यावरी

घट तिचा रिकामा झर्‍यावरी,
त्या चुंबिति नाचुनि जललहरी.

अशी कशी ही जादू घडली?
बघतां बघतां कशी हरपली?
का समजुनिया राणी अपुली
तिज उचलुनी नेई कुणितरी?

मिळत चालल्या तिनिसांजा,
दिवसाचा हा धूसर राजा,
चंद्रा सोपुनि आपुल्या काजा
घे निरोप कवळुनि जगा करीं.

पलीकडे त्या करुनि कापणी
बसल्या बाया हुश्श करोनी,
विनोद करिती, रमती हसुनी,
जा पहा तिथे कुणि ही भ्रमरी.

तिथे वडाच्या पाळीभवती,
नवसास्तव मृगनयना जमती;
कुजबुजुनी गुजगोष्टी करिती;
रतिमंजरि हेरा तिथे तरी.

पलीकडे वेळुंची जाळी;
तेथे वारा धुडगुस घाली,
शीळ गोड तीमधुनि निघाली,
ही झुळुक हरपली लकेरिपरी.
गीत - भा. रा. तांबे
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १५ फेब्रुवारी १९२२, अजमेर.
काज - काम.
मंजिरी - मोहोर, तुरा.
वेळू - बांबू.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.