A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा दु:खभोग सारा

हा दु:खभोग सारा माझा मला उरावा
पतिसंगती सुखाने संसार तू करावा !

संपून आज गेली ती प्रीतिची कहाणी
डोळ्यांत ना तरीही मी आणणार पाणी
साहीन मी सदाचा दोघांतला दुरावा
पतिसंगती सुखाने संसार तू करावा !

मी पाहतो मनाने घरकूल साजिरे ते
सौभाग्यसाउलीला तू नांदतेस जेथे
आनंद आसमंती तेथे तुझा भरावा
पतिसंगती सुखाने संसार तू करावा !

अंकावरी तुवा गे निज बाळ खेळवावे
हासू कृतार्थतेचे ओठी तुझ्या फुलावे
ते चित्र पाहताना हा जन्म ओसरावा
पतिसंगती सुखाने संसार तू करावा !
अंक - मांडी.