A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा मंद मंद वारा

हा मंद मंद वारा, ही धुंद रातराणी
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी !

दाही दिशांमधुनी ये पूर चांदण्याचा
वार्‍यात गंध आहे हळुवार चंदनाचा
ओथंबली नभाची फुलवेल तारकांनी
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी !

गेल्या मिळून आता छाया परस्परांत
शय्येवरी विसावे प्रीती घराघरांत
मी मात्र भारलेली येथे उभी दिवाणी
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी !

आहेस काय तूही माझ्यापरी उदास?
असशील का अशी तू निरखीत चांदण्यास
नि:शब्द हुंदका तो, येतो कुठुन कानी
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी !

दूरातुनी कुणाची चाहूल काय येई?
ही आस, भास वेडा- वेडीच काय मीही?
स्वप्‍नात पाहिलेली स्वप्‍नी उरे कहाणी
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.