A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा उनाड अवखळ वारा

हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा

हे कुंतल-काळे मेघ डोळ्यांत नाचते वीज
अंगावर फुलुनी आली ही यौवनातली लाज
चालीतून माझ्या भरला हरिणीचा नाजूक नखरा

हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी
सुमगंध सोडुनी भुंगे लागलेत माझ्या नादी
बांधिते अशी पदराशी गंधीत फुलांच्या नजरा

बहराच्या हिरव्या रानी परदेशी आला रावा
भुलवून जिवाला बाई तो नेई दूरच्या गावा
मधुबोल तयाचे रुजवी अंगावरी गोड शहारा
कुंतल - केस.
रावा - पोपट.
सुम - फूल.