A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे कुठवर साहू घाव शिरी

सरणार कधी रण प्रभू तरी !
हे कुठवर साहू घाव शिरी?

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरि ही छाती
अजून जळते आंतर-ज्योती
कसा सावरू देह परि?
सरणार कधी रण प्रभु तरी !

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्‍ग गळाले भूमिवरी
सरणार कधी रण प्रभु तरी !

पावन-खिंडित पाउल रोवुन
शरीर पिंजे तो केले रण
शरणागतिचा अखेर ये क्षण
बोलवशिल का अता घरी?
सरणार कधी रण प्रभु तरी !
अभ्र - आभाळ, मेघपटल.
पिंजणे - फाडणे, विस्कटून मोकळा करणे.
विदीर्ण - फाडलेले / भग्‍न.
वीरपूजन हा कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा एक खास विशेष आहे. ज्या व्यक्तीच्या ठायी त्यांना काही भव्यदिव्य दिसते.. त्याग, समर्पणशीलता वा असाधारण धैर्य इत्यादींसारखे गुणविशेष आढळतात, त्या व्यक्तीसमोर कुसुमाग्रजांची प्रतिभा जणू नतमस्तक होते. 'विशाखा' व 'किनारा' या त्यांच्या आरंभीच्या संग्रहांत अशा काही वीरपूजन करणार्‍या कविता आहेत.

पावनखिंड हा शब्द उच्चारताच आपणास शिवाजीकरिता खिंड अडवून तोफेचे आवाज होईपर्यंत लढत राहणारा आणि अखेर शिवाजी महाराज गडावर सुखरूप पोहोचल्याच्या तोफा होताच आत्मार्पण करणारा वीर बाजीप्रभू आठवतो. 'पावनखिंडीत' या कवितेत मृत्यूच्या प्रतीक्षेत असणार्‍या बाजीप्रभूचे मनोगत आढळते. निष्ठेखातर, कर्तव्याखातर शरीर पिंजून जाईपर्यंत रणसंग्राम केलेला बाजीप्रभू जणू ह्या संग्रामसमाप्तीच्या अखेरच्या क्षणाची, मृत्यूची वाट पाहत आहे आणि ईश्वराला 'सरणार कधी रण प्रभू तरी?' अशी पुन:पुन्हा पृच्छा करीत आहे, असे चित्र येथे उभे केलेले आहे.

वास्तविक 'पावनखिंडीत' या कवितेत कोठेही शिवाजी महाराज किंवा बाजीप्रभू यांपैकी कुणाचेही कोठेही नाव नाही. त्यामुळे आणि एकूण या कवितेतील परमेश्वराच्या आळवणीचा विशिष्ट सूर लक्षात घेता, या कवितेचा आणखीही वेगळा अर्थ घेता येतो. अटीतटीने जीवसंग्राम लढवणार्‍या कोणत्याही एका प्रांजळ व्यक्तीची मृत्यूच्या प्रतीक्षेच्या वेळची भावना, असे ह्या कवितेचे स्वरूप पाहता येते. 'रण' हा शब्द कुसुमाग्रजांनी अनेकदा जीवन किंवा जीवनसंग्राम या अर्थाने इतर कवितांमधून वापरलेला आहेच. तो लक्षात घेता, जो कोणी एक माणूस प्रामाणिक, कृतार्थ असे जीवन जगला अशा कोणा एकाचे, मृत्यू लवकर यावा म्हणून परमेश्वराला आळवणे, अशा स्वरूपात ही कविता आस्वादता येते.

चांगली कविता ही अनेक अर्थवलये घेऊन येते. 'पावनखिंडीत' ही कविता याही अर्थाने चांगली ठरते.
(संपादित)

डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्‍नेहल तावरे
त्रिदल
बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्‍नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे

  इतर संदर्भ लेख

 

Print option will come back soon