A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे पत्र तुला लिहिताना

हे पत्र तुला लिहिताना का अबोल होते शाई?
का रंग खरा शब्दांचा पानावर उमटत नाही?
नभ ओळवते, मन मोहरते, पण तोल जात नाही
अनिवार सरी, उरतात उरी, बरसात होत नाही

ह्या अजाण शब्दांच्या ओठी अल्लड गाणे
हे वयात येणारे अवखळ अमोल तराणे
हे कागद-कोरे अंगण, आतुर भिजाया कणकण
कधी बावरे, कधी सावरे, मन बोलत नाही काही

त्या तुझ्या किनार्‍याला जाती लाखो लाटा
कोणत्या दिशा माझ्या, कुठल्या माझ्या वाटा
व्याकूळ मनाच्या द्वारी, अस्वस्थ क्षणांची वारी
क्षण अक्षरे, क्षण भोवरे अन्‌ अजुनी बरेच काही
गीत - वैभव जोशी
संगीत - अशोक पत्की
स्वर- सुवर्णा माटेगावकर
अल्बम - सावळ्या घना
गीत प्रकार - भावगीत