A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही भूमी महाराष्ट्राची

ही भूमी महाराष्ट्राची, शेतकर्‍यांची, कामगारांची
इथे हो बुद्धिमंत रमले, श्रमिक हो एकसंघ झाले
गाउया एकजुटीचा मंत्र सारे हो..

सह्याद्रीच्या कड्याकड्यातुन घामांचे पाझर
केळी अन्‌ नारळी-पोफळी प्रेमाची पाखरं
खडक रुपेरी कणसामधुनी सौख्याचे निर्झर
शेतामधला स्वाद गुलाबी शिंपडतो अत्तर
ही खाण जणू संतांची, नररत्‍नांची, कलावंतांची
मनाने मानी आणि दिलदार, सर्वथा अभिमाना जपणार
गाउया एकजुटीचा मंत्र सारे हो..

कृष्णा-गोदा आणि कोयना उल्हासे वाहती
धर्म पंथ जाती पडजाती एकरूप संगती
ग्रीष्म शिशिर अन्‌ वर्षासंगे प्रेमफुले बरसती
सागरलहरी पुनीत मनानें चरणांना स्पर्शती
ही माती खर्‍या कष्टांची, परंपरांची, अतुट ध्येयांची
कितीहो दिगंत कीर्तिचें, केवढे पंडित शास्त्रांचें
गाउया एकजुटीचा मंत्र सारे हो..

कडे-कपारी, बुरूज-किल्ले शौर्याचे दाखले
इतिहासाच्या आर्दशाचे पोवाडे रंगले
मराठमोळी जिद्द उरांशी शूर आम्ही सरदार
छत्रपती शिवरायांचे तर थोर थोर उपकार
ही भूमी असे शिवबांची, शूर-वीरांची, असीम त्यागांची
आमुची प्रिय अम्हां जननी, नमन हो वंदनीय चरणीं
गाउया एकजुटीचा मंत्र सारे हो..
पुनीत - शुद्ध, पवित्र.

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  आकाशवाणी गायकवृंद