A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही नटरंगी नार

ही नटरंगी नार, मारी काळजात वार
पाडी कासोट्याला पार, चापुनिया पट्टी

पाटलाला दावला चाळा, कुलकर्ण्याला घालते डोळा
मास्तरांनी सोडली शाळा हिच्यासाठी

तेल्यापासून तेल बघा नेती, वाण्यापासून गूळ ही घेती
हिनं गुजरला येडा केला
खुळा झालाया बामण, सोडून दिले देवध्यान
मागं पंचांग घेऊन पळतोया किती

खाऊन मिठाईचा पुडा, केला हलवायाला येडा
हिनं कितिकांना दिला बघा धडा
लागली न्हाव्याच्या पाठी, त्याची लिलाव केली धोपटी
अशी नार हिच्याकाठी भुलविले किती

हिचा पाहुनिया ताल, फुगले सोनाराचे गाल लाल
त्यानं दुसर्‍याचा माल हिला दिला
लावलं तांबटाला पिसं, केलं बुरडाचं हसं
परटाचा पाडला खिसा, आता सांगू किती

हिचा कळला नाही कावा, सोडला कुंभारानं आवा
गुरवाला दावली बघा हवा
अशी बाजिंदी नार, हिचं दिसणं गुलजार
म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा
गीत - शाहीर पठ्ठे बापूराव
संगीत -
स्वर- शाहीर साबळे
गीत प्रकार - लोकगीत
आवा - कुंभाराची भट्टी.
धोपटी - न्हाव्याची चामडी पेटी.
बाजिंदा - हुशार; लुच्चा.