A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हिरवेपिवळे तुरे उन्हाचे

हिरवेपिवळे तुरे उन्हाचे खोविलेस केसांत उगा का?
वार्‍याचे हळू पीस फिरवुनी उसळ्यास हिरव्या लहरी का?

पिवळीकाळी फूलपाखरें फेकुनी मजवर भिवविसी का?
लाल फुलांनी भरता ओंजळ, माझी मजवर उधळसी का?

सहसा शिंपुनी गुलाबपाणी ढगाआड दडलास वृथा का?
प्रतिबिंबानी निळ्याजांभळ्या तनमन अवघे व्यापिसी का?

अशी हरवली राणी मीरा, अशी हरवली राधा गौळण
असेच मी मज हरवून जावे हेच तुझ्या मनी जागत का?