A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
होईल का हे स्वप्‍न खरे

होईल का हे स्वप्‍न खरे?
वाहीन चरणी तनमन माझे, किती हर्षभरे

हरुनि आपदा दीनजनांच्या सुखविल जीव भुकेला
येइल घेऊनि आशिर्वचना मिरवीत नृपवैभव हे
नृप - राजा.
'कुबेर' या चित्रपटानंतर मी दोनतीन चित्रपटांत संगीतरचना केली. काही चाली चांगल्या झाल्या. त्यातल्या दोन मी मुंबई रेडिओवर ध्वनीमुद्रीत केल्या. सौ. माणिक वर्मा यांनी त्या गायल्या, लोकप्रियही झाल्या. 'तुजसाठी रे घननीळा', 'चित्र तुमचे रेखिते' ही दोन सुंदर गीते श्री. माडगूळकररचित. माडगूळकरांची गाणी बहुश: चांगलीच असतात. प्रसंगोचित असून त्यातील भावनेची अभिव्यक्ती स्पष्ट असते. शब्दरचना गेयतेला धरून अत्यंत पोषक असते. चित्रपटांत उत्तम गाणी रचणार्‍या कवीत त्यांचा दर्जा फार वरचा आहे. राजा बढे, मो. ग. रांगणेकर, प्र. के. अत्रे, शांताराम आठवले हे कवीही त्या मालिकेतील अग्रेसर आहेत.

चित्रपटातील वाङ्मय अक्षर होईल का? हा प्रश्‍न नेहमीच विचारला जातो. हे वाङ्मय चित्रकथेच्या अनुषंगाने आलेले असते. धावत्या चित्रांच्या साहाय्याने कथा नाट्यपूर्ण सांगणे, ती नेत्रांच्याद्वारे प्रेक्षकांना कळणे ही मूळ कला ! तींत वाङ्मय आल्याने या कलेच्या प्रगतीत अडसर पडला- म्हणून चार्लस्‌ चॅप्लिन या शब्दांच्या (म्हणजे संवादाच्या) बरेच वर्षे विरुद्ध होता. मग नाइलाजाने त्याने शब्दाला आंत घेतले, तरी त्याचा उपयोग नियंत्रित ठेवला. तो लांबलचक संवांदाच्या विरुद्ध होता. पण हॉलिवुडमध्ये शब्द आल्यावर लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, नाटककार या सृष्टींत घुसले आणि पात्रें नाटकांतल्या संवादांसारखे संवाद पडद्यावर बोलू लागली.

मूक चित्रपटांतल्या काही नटनटी बोलता न आल्याने बाहेर पडल्या. रंगभूमीवरचे प्रख्यात नट या सृष्टींत आले. परिणामीं 'फोटो प्ले' सारखे सोयीस्कर नाव धारण करून चित्रपट बाहेर पडू लागले. पण हे वाङ्मय प्रसिद्ध होत नव्हते. त्यात शब्दांना महत्त्व नाटकासारखे आले आहे, पण धड ना नाटक धड ना चित्रपट- अशी सध्या धेडगुजरी अवस्था आहे. चित्रपटातील अंगभूत असलेल्या- म्हणजे हे वाङ्मय अक्षर होण्यामध्ये या अडचणीच महत्त्वाच्या आहेत. चित्रपट खूप आठवडे चालतो. पण त्यातले वाङ्मय दुसर्‍या दिवशीही आठवत नाही. मग ते अक्षर कसे व्हावयाचे?
यावर खूपच चर्चा व्हायला हवी !
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.